हा आजार कोरोना झालेल्या बालकांना दोन आठवडे ते तीन महिने या काळात उद्भवू शकतो. पीआयएमएस आजार कोरोना विषाणूविरुद्ध शरीरातील ऑण्टीबाॅडीज तयार होण्याच्या क्रियेमुळे होतो.
या आजाराची लक्षणे गंभीर स्वरूपाची असू शकतात. बालकांपैकी खूपच कमी प्रमाणामध्ये मुलांना अशी लक्षणे आढळतात.
यात कोरोना विषाणूमुळे कावासकी रोग व विषारी शॉक सिंड्रोमसारख्या इतर दुर्मीळ अवस्थेसारखी लक्षणे आहेत.
या आजारामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे, किडनी, लिव्हर, आतड्यांवर सूज येऊ शकते. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, जीभ लाल होणे, अंगावर सूज येणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, शुद्ध हरपणे, झटके येणे, बाळ पेंगून राहणे, दम लागणे, उलट्या होणे अशी लक्षणे राहतात.
निदान व उपचार
यासाठी विभिन्न चाचण्या वापरू शकतात. १) रक्त व लघवी चाचण्या २) छातीचा एक्स-रे ३) इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे हृदयातील विद्युत क्रियकल्प मोजते. ४) इकोकार्डिओग्राम (हृदय अल्ट्रासाऊंड). याच्या उपचारासाठी या मुलांना अतिदक्षता विभागात दाखल करावे लागू शकते. उपचारानंतर पीआयएमएस हा आजार बरा होऊ शकतो.
--------
प्रतिबंधात्मक काळजी
हा आजार असलेल्या मुलांना रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर दोन-तीन आठवडे बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे. रुग्णांना व्यायाम किंवा खेळ यांसारख्या क्रियाकल्पांसाठी काही काळ प्रतिबंधित करणे, वारंवार हात धुणे, मास्क व सॉनिटायझरचा वापर करणे, आजारी लोकांशी संपर्क टाळणे, मुलांना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.
- डॉ. उज्ज्वला शिरसाठ-ढाकणे (बालरोग तज्ज्ञ)