अहमदनगर : महापालिकेमार्फत शासकीय योजनेतील केल्या जाणाऱ्या विकासकामांची त्रयस्थ संस्थेकडून कागदोपत्री तपासणी होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे करण्यात येतात. या कामांसाठी शासनाकडून निधी मिळत असला तरी ही कामे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येतात. आशा कामांची बिले काढताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात तपासणी न करता कागदोपत्री तपासणी सुरू असल्याबाबतची तक्रार सेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून होणाऱ्या तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बांधकामासाठी वापरले जाणारे सिमेंट, खडी, डांबर आदी साहित्य तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून तपासण्यात येते. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर ते अंदाजपत्रकानुसार झाले आहे किंवा नाही, याबाबतची तपासणीही तंत्रनिकेतनमधील प्राध्यापकांकडून केली जाते. बांधकाम साहित्याची तपासणी करणाऱ्या संस्था थर्ड पार्टी कशी होऊ शकते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
विकासकामांच्या तपासणीबदल्यात कामाच्या एक टक्का रक्कम ठेकेदरांना संस्थेकडे जमा करावी लागते. तसेच एक टक्के रकमेवर १८ जीएसटी ठेकेदाराला द्यावी लागते. ही रक्कम तंत्रनिकेतन महाविद्यालयाला मिळते. परंतु, त्या बदल्यात ही संस्था खरंच विकासकामांची जागेवर येऊन तपासणी करते का, जर कामांची संस्था केली असेल तर किती कामांमध्ये अनियमितता आढळली. त्रयस्थ संस्थेने अक्षेप घेतलेल्या किती ठेकेदारांवर महापालिकेने कारवाई केली, यासह अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले झाले आहेत. त्यामुळे त्रयस्थ संस्थेकडून केली जाणारी तपासणी यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
...
बांधकाम साहित्य व थर्ड पार्टी तंत्रनिकेतनकडेच
महापालिकेच्या विकासकामांसाठी वापरले जाणारे बांधकाम साहित्य तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडून तपासले जाते. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर हे काम अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार झाले किंवा नाही, याचीही तपासणी तंत्रनिकेतनकडूनच केली जाते. एकाच संस्थेकडून दोन्ही तपासण्या करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, असा प्रश्न अनुत्तरित आहे.