अहमदनगर : भाजपाचे उत्तरेचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर शिर्डीत, तर दक्षिणेचे अध्यक्ष अरुण मुंडे हे शेवगावच्या बाहेर पडलेले नाहीत़. अहमदनगर शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे हे तर घराच्या बाहेरही पडायला तयार नाहीत. आपला तालुका हीच ग्रामीण जिल्हाध्यक्षांची लक्ष्मण रेषा असल्याचे त्यांनी स्वत:च्या तालुक्यात ‘क्वारंटाईन’ करून घेत सिद्धच करून टाकले आहे.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड हे आजही तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून आहेत़ अन्नदान वाटपाच्या निमित्ताने शहराचे माजी अध्यक्ष व माजी खासदार दिलीप गांधी हेही संपर्कात आहेत. त्यांनीही तृतीयपंथियांना अन्नधान्याची मदत केली. परंतु, अन्य भाजपचे पदाधिकारी व माजी मंत्री व विद्यमान अध्यक्ष एक चकार शब्दही काढताना दिसत नाहीत़.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे़ महामारीच्या संकटाने सामान्य माणूस भयभित झाला आहे़ हाताला रोजागार राहिलेला नाही़ सरकारी योजनांचा लाभ अनेकांना मिळालेला नाही़ शेतकरी हवालदिल झाला आहे़ जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे काम विरोधी पक्षाचे असते़ मात्र नगर जिल्ह्यात विरोधी पक्षच आहे की नाही, असा प्रश्न पडतो आहे. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने धोका वाढला आहे़ पण, त्यावर बोलणार कोण? विरोधी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुठे गायब आहेत, ते सापडायला तयार नाहीत़ अध्यक्षपदे घेताना जसामान्यांचे कैवारी असल्याचा आव आणला जातो. पण लॉकडाऊनच्या काळातही हे दोन्ही अध्यक्ष आपआपल्या तालुक्याच्या बाहेर पडताना कुठेच दिसले नाहीत़ त्यात आता सर्वसाधने उपलब्ध असल्याने पक्ष वाढीसाठी किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दौºयांची गरज नाही़ घरबसल्या संवादही साधता येतो़ माजी जिल्हाध्यक्षांनी असा संवाद साधलाही़ पण विद्यमान अध्यक्षांनी मात्र मौन पाळले आहे. याचा अर्थ जिल्ह्यातील कोरोना आणि उपाययोजना योग्य पध्दतीनेच सुरू आहे, असाच काढायचा का़ मग इतरांनी तरी गळा का आणि कशासाठी काढावा, हाही प्रश्न आहेच़
---
अध्यक्षांचे नावेही आठवेनात
पूर्वी शहराला एक व ग्रामीणसाठी एक असे दोनच जिल्हाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामातून त्यांची नावे संपूर्ण जिल्ह्याभरात चर्चेची होती. पक्षाने विक्रेंदीकरणाच्या नावाखाली एका जिल्ह्यात तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले. मात्र एकाचेही नाव कोणाला आठवत नसल्याचे चित्र आहे. भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण? असा भाजपच्या कार्यकर्त्याला जरी प्रश्न केला तरी त्याला आठवण्यासाठी वेळ द्यावा लागेल, अशी स्थिती सध्या भाजपात आहे.