आमदार राधाकृष्ण विखे यांच्या थोरातविरुद्ध विखे या दोन गटांत चुरस पहायला मिळाली. १४ पैकी ६ ग्रामपंचायतींमध्ये थोरात गटाचे, तर ७ ग्रामपंचायतींमध्ये विखे गटाचे सर्वाधिक सदस्य विजयी झाले. पानोडी, शेडगाव, चिंचपूर, झरेकाठी या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. या चार ग्रामपंचायती विखे गटाकडून थोरात गटाकडे गेल्या आहेत. चिंचपूरमध्ये ३५ वर्षांनंतर तर पानोडी, शेडगाव व झरेकाठीमध्ये पाच वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. थोरात गटाच्या ताब्यातील मनोली व कनोली या दोन ग्रामपंचायती विखे गटाकडे गेल्या आहेत.
विकासाच्या मुद्द्यांवर खळी ग्रामपंचायतींमध्ये पाच सदस्य बिनविरोध झाले होते. तेथे थोरात व विखे या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविली होती. काँग्रेस व भाजपची खळी गावातील युती संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली होती. साहेबराव नवले यांच्या संगमनेर तालुक्यातील मालदाड गावात यंदा सत्ता परिवर्तन झाले आहे. महसूलमंत्री थोरात यांच्या कानिफनाथ शेतकरी विकास परिवर्तन मंडळाचे सात उमेदवार विजय झाले, तर नवले यांच्या श्रमशक्ती ग्रामविकास मंडळाचे चार उमेदवार विजयी झाले. मालदाड ग्रामपंचायतीची ३५ वर्षांपासून नवले यांच्याकडे असलेली सत्ता महसूलमंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी खेचून आणली आहे.