संगमनेर : शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडून सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांची रोकड लांबविली. बुधवारी रात्री साडेदहा ते गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कमलाकर विश्वनाथ भालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. शहरातील चंद्रशेखर चौकात हे प्राचीन श्रीराम मंदिर आहे. बुधवारी रात्री पूजा झाल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. गुरूवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुजारी असलेले सतीश तांबे मंदिरात पूजेसाठी जात असता त्यांना हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या या मंदिराच्या छोट्या प्रवेशद्वाराचा कोंडा कापलेला दिसून आला. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांना तेथील दानपेटी फोडलेली दिसून आली. चोरी झाल्याचा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी याची माहिती चंद्रशेखर चौक परिसरातील कमलाकर भालेकर, सोमनाथ पराई व माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांना कळविली. या सर्वांनी लागलीच पोलीस ठाणे गाठत मंदिरात चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.मारूती मंदिराशेजारी असलेल्या या मंदिराच्या छोट्या प्रवेशद्वाराचा कोंडा चोरट्यांनी कटरच्या साह्याने कापून मंदिरात प्रवेश केला. नुकतेच श्रीरामनवमी व हनुमान जन्मोत्सव हे शहरातील दोन मुख्य उत्सव पार पडले. या काळात भाविकांनी पेटीत अर्पण केलेले दान चोरट्यांनी लंपास केले. पोलीस हेडकॉन्स्टेबल ए .एस. वाघमारे तपास करीत आहेत.
संगमनेरमधील राममंदिरातील दानपेटी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:13 PM