शिर्डी : साईदरबारी भाविकांचा ओघ कायम आहे. गेल्या चौदा दिवसांत जवळपास अडीच लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साईंना जवळपास सव्वा तीन कोटी रुपयांची दक्षिणा अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.
१५ डिसेंबर ते आजपर्यंतच्या दक्षिणा पेट्या मंगळवारी उघडण्यात आल्या. या रकमांची मोजदाद दिवसभर सुरू होती. दक्षिणा पेटीत ३ कोटी १६ लाख ८३ हजार ९८० रुपये रोख स्वरूपात मिळाले. यात ३ कोटी ११ लाख ४४ हजार ८३१ रुपयांच्या नोटा, तर ५ लाख ३९ हजार १४९ रुपयांच्या नाण्यांचा समावेश होता. याशिवाय ४ लाख १२ हजार रुपयांचे ९३ ग्रॅम सोने व १ लाख ९९ हजार रुपयांची ३८०८ ग्रॅम चांदीसुद्धा भाविकांनी बाबांना अर्पण केली आहे. तसेच जवळपास साडे आठ हजार रुपयांचे विदेशी चलनही दक्षिणा पेटीत मिळून आल्याची माहिती बगाटे यांनी दिली. यावेळी डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते.