संडे मुलाखत - गोरख देवकर।
अहमदनगर : मका पिकावर उपजीविका करणारी अमेरिकन लष्करी अळी कपाशी पिकावर आढळून आली. सुसरे (ता. पाथर्डी) येथे ही अळी प्रथमच कपाशीवर आढळली. शेजारी मकाचा प्लॉट असल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला. योग्य खबरदारी घेतल्यास अळीचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. त्यामुळे शेतक-यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर यांनी दिली.प्रश्न : कपाशीवर लष्करी अळी आल्याचे कसे समजले?भोर : सुसरे (ता. पाथर्डी) येथे क्रॉप स्वॅप अंतर्गत कपाशीच्या प्लॉटला आमच्या कृषी सहायकाने भेट दिली. त्याला तेथे अळी आढळली. त्याने मला माहिती दिली. आम्ही स्पॉट व्हिजीट केली. तेथे वेगळी अळी आढळली. ती लष्करी अळी असावी, अशी शक्यता वाटल्याने याची माहिती राहुरी विद्यापीठातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब फंड, किटक शास्त्रज्ञ डॉ. एन. के. भुते, डॉ. व्ही. चिन्नाबाबू नाईक आदींना दिली. त्यांनी सर्वांनी सुसरे येथे भेट दिली. त्यांनी पाहणी केली व कपाशीवर लष्करी अळी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी यावरील उपाययोजनांचीही माहिती दिली.प्रश्न : अळी मक्यावरून कपाशीवर आली कशी? भोर : बहुभक्षीय ही अळी ८० पिकांवर उपजीविका करते. कपाशीवर प्रथमच लष्करी अळी आढळली. सुसरे येथील शेतकºयाच्या कपाशीच्या प्लॉटच्या शेजारीच मक्याचा प्लॉट होता. मका हे लष्करीचे आवडते खाद्य आहे. त्या मक्यावर लष्करीचा प्रादुर्भाव होता. त्या मका पिकावर रोटाव्हेटर मारला होता. ती प्रादुर्भावग्रस्त मका व्यवस्थित नष्ट झाली नव्हती. त्यामुळे तेथील अळी शेजारील कपाशी पिकावर गेली. प्रश्न : अळीने कपाशीच्या कोणत्या भागावर हल्ला केला?भोर : लष्करी अळीने प्रथम कपाशीची फुले, बोंड्यावर हल्ला केला. त्याचे नुकसान केल्याचे आढळून आले. यावर उपाययोजना आहेत. योग्य मार्गदर्शन व खबरदारी घेतल्यास लष्करीचाही नि:पात शक्य आहे. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.प्रश्न :अनेक गावात कपाशीवर अळी आढळत आहे का?भोर : काही भागात कपाशीवर लष्करी अळी आढळत आहे. मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. शेतकºयांनी खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येईल.