अहमदनगर - राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या बिनधास्त स्वभावामुळे व स्पष्टवक्तेपणामुळे चांगलेच चर्चेत आहेत. आपल्या भाषणातून अनेकदा ते उपस्थितांना मोलाचे सल्ले देतात तर कधी कधी कार्यकर्त्यांना दमही भरतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात बागेश्वर बाबांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या बाबांच्या दरबाराबद्दल गत आठवड्यात सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू होती. मात्र, बुवा-बाबांच्या नादी लागू नका, असा सल्ला देत अजित पवारांनी उपस्थितांना डोक्यावरील केसाचं उदाहरण दिलंय.
अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत असताना बुवा-बाजीच्या नादाला न लागण्याचा सल्ला दिला. संतांची शिकवण ऐका, महापुरुषांच्या विचारांची जोपासणा करा, पण बुवा-बाबांच्या नादाला लागू नका, अशा शब्दात अजित पवार यांनी भरसभेत आपल्या डोक्यावरील गेलेले केसं दाखवले. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही त्या रामदेव बाबांनी सांगितलं म्हणून सगळे नखाला नखं घासता का, अशी नखावर नखं घासली की, डोक्यावर केसावर केसं येतात. पण केसं यायचं तर बाजूला राहिलं, काही खरं नसतं, असे म्हणत त्यांनी डोकं खाली घेऊन आपल्या डोक्यावर केसं नाहीत हे दाखवून दिलं.
अहिल्याबाई होळकर यांचं ऐका, शाहु-फुले-आंबेडकर असतील. मौलाना आझाद असतील त्यांचं ऐका. या सगळ्या महान व्यक्तींचं ऐका, पण, बुवाबाजीचं काही ऐकू नका. नखाला नखं घासू नका, काही तरी तिसरच व्हायचं, डॉक्टरकडे गेल्यावर ते तुम्हाला इंजेक्शन करायला लावतील, हे कुणी करायला सांगितलं असं म्हणतील. त्यामुळे बुवाबाजीचं ऐकू नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला. त्यावेळी, उपस्थितांमध्ये हशा पिकला.