कोपरगाव : शहरातील समतानगर, शिंदे-शिंगीनगर व महात्मा फुलेनगर येथे मोठ्या प्रमाणात नागरी रहिवास आहे. शेजारीच चर्च, कॉन्व्हेंट स्कुल असल्याने या भागात कुठल्याही मद्य व्यवसायास परवानगी देवू नये, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी सामुहिकरित्या कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना मंगळवारी (दि.२१) निवेदन देत केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, पालिकाहददीतील समतानगर, शिंदे-शिंगीनगर व महात्मा फुले नगर येथे मोठ्या प्रमाणांत नागरी वस्ती आहे. महाजन गोठ्याजवळ नव्याने बिअर व वाईन शॉपी सुरू करण्यांबाबतचे प्रकटन काढण्यात आले आहे. त्यामुळे याभागातील रहिवासीयांना मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या जागेवर मद्य व्यवसायास परवानगी दिल्यास त्यातून तरूणपिढीमध्ये व्यसनाधिनता वाढून गोर गरीब जनतेचे संसार प्रपंच उदवस्त होणार आहे, मद्यपींचा त्रास महिला भगिनीसह शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. हा संपूर्ण परिसर नागरी रहिवास वस्तीचा आहे. शेजारीच चर्च कॉन्व्हेंट स्कूल आहे. त्यावरही विपरीत परिणाम होवुन येथील शांतता धोक्यात येवून कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या निवेदनावर दीपक जपे, विजय भाकरे, अशोक साबळे, मुरलीधर उपाध्याय, संतोष शिंदे, कुंदन सिन्हा, सचिन गुंजाळ, धोंडीराम निंबाळकर, सतीश जाधव यांच्यासह समतानगर, शिंदे-शिंगीनगर, महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.