स्टार १०६८
श्रीरामपूर : ओटीपी किंवा संदेश आल्याचे सांगून तुम्हाला कुणी मोबाईल मागितला तर चुकूनही देऊ नका. कारण त्यामुळे काही क्षणातच बँक खात्यातील रक्कम गायब होण्याचा धोका आहे. असे प्रकार महानगरामध्ये सर्रास घडत आहेत. त्यापासून बोध घेऊन अनोळखी व्यक्तींच्या हातात शक्यतो मोबाईल देऊच नये याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
आधुनिक जीवनशैलीत डिजिटल सेवेअंतर्गत ई कॉमर्सचा झपाट्याने विस्तार वाढला आहे. त्वरित निधी हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेत अनेकदा घोळ होत असतो. तुमच्या समोरील किंवा बाजूला उपस्थित असलेल्या व्यक्तीने तुमचा मोबाईल क्रमांक मागवून ओटीपी आल्याचे सांगितल्यास त्याला मोबाईल देऊ नका अन्यथा फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही.
--------
ही घ्या काळजी
कुठलीही बँक किंवा संस्था ग्राहकाची व्यक्तिगत माहिती मागवत नाही. त्यातही पासवर्ड, सीव्हीसी कोड किंवा ओटीपीची कुठलीही गरज बँकेला राहत नाही.
कुठल्याही कारणाने कुणी अनोळखी व्यक्तीने मोबाईल मागितल्यास त्याला देऊ नका. त्याच वेळी त्याची विचारपूस तेथे कुणी पोलीस कर्मचारी असल्यास त्यांना अवगत करावे.
जबरदस्तीने कोणताही अनोळखी व्यक्ती हातातून मोबाईल घेऊ शकत नाही. त्यामुळे आरोपी शक्यतो वेगवेगळी शक्कल लढवून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी त्याला बळी न पडणे गरजेचे असते.
-----------
ओटीपी येण्यापूर्वी मोबाईलमध्ये एक मेसेज प्राप्त होतो. त्यात कोणत्या कारणास्तव ओटीपी मागविला याचा उल्लेख असतो. त्यामुळे मेसेज वाचून त्याबाबत खात्री करावी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँका कधीही अशा प्रकारे ग्राहकांना ओटीपी मागत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी असते.
प्रतीक कोळी,
निरीक्षक, सायबर सेल, नगर.