पारनेर : शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलू नये, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी शनिवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयात बैठक घेतली. या वेळी भोसले म्हणाले, तहसीलदार ज्योती देवरे यांनी मागील लॉकडाऊनमध्ये उत्कृष्ट काम केले. आता त्यांनी पुन्हा कार्यक्षमपणे काम करावे, तहसीलदार, बीडीओ, नगरपंचायत, आरोग्य अधिकारी, सर्व यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सुनीता कुमावत आदींसह अधिकारी उपस्थित होते.
---
आठवडे बाजार सुरूच राहणार..
आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल येत असतो. त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आठवडे बाजार बंद राहणार नाही. परंतु, बाजारात मास्क वापरले नाही, गर्दी वाढत चालली तर तहसीलदार यांनी बाजार बंदबाबत निर्णय घ्यावे, असे भोसले यांनी सांगितले.
---
सुपा परिसरात कडक अंमलबजावणी करा
सुपा परिसरात व एमआयडीसी भागात मास्क वापरणे, गर्दी कमी करणे यासाठी पोलीस अधिकारी व सर्व विभाग यांनी कडक अंमलबजावणी करावी, असे भोसले यांनी सांगितले. लग्न व विविध कार्यक्रम शेत वस्ती किंवा कुठे असतील त्यांची माहिती सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांनी संबंधित अधिकारी यांना द्यावी, अशाही सूचना भोसले यांनी केल्या.
---
२१पारनेर पाहणी
पारनेर शहरातील सुतार गल्लीत कंटेनमेंट झोनची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, मुख्याधिकारी सुनीता कुमावत, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लाळगे.