बोधेगाव : कोरोनाच्या तांडवात अगदी जवळची माणसं सोडून जात आहेत. भावपूर्ण.. असे शब्द उच्चारताना ही काळजाचा थरकाप उडत आहे. अशा परिस्थितीत शेवगाव तालुक्यातील चेडेचांदगाव शाळेतील गुरूजींनी खचू नका.. कुणालाही खचू देऊ नका, अशी भावनिक विनवणी करत एकमेकांना आधार देण्याचे आवाहन विनंती पत्रातून सोशल मीडियातून केले आहे.
चेडेचांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असणारे नीलेश दिलीप दौंड हे कवी, लेखक आहेत. त्यांचे काही बाल एकांकिका, कादंबरी आदी साहित्य प्रकाशित आहे. त्यांच्याकडून कवितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कोरोनाच्या संकटात धीर देण्याचे काम केले जात आहे, तसेच त्यांची विनंती पत्र या मथळ्याखालील एक पोस्ट सध्या सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. यामध्ये ते सर्वांना प्लीज हात जोडून विनवणी करत आहेत. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्यावर प्रेम करणारी, भरवशावर जगणारी हजारो माणसं आहेत. कृपया स्वतःला जपा. जीवनाला रिव्हर्स गीयर नाही.
आतापासून योगासने, व्यायाम सुरू करा. मोबाइल, टीव्हीमधून बाहेर पडून पुस्तके वाचा, छंद जोपासा. धावपळ खूप झाली. अजून खूप आनंदी जीवन जगायचे आहे. मित्रांनो, खचू नका, कुणालाही खचू देऊ नका. जवळच्या व्यक्तींना सांगा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. एकमेकांचा आधार बना. तुमच्या रूपाने सकारात्मक ऊर्जा बाहेर पडू द्या. कधी कुणाचा आधार घेऊन तर कधी कुणाचा आधार बनून जीवन जगू या.. प्लीज काळजी घ्या, असे भावनिक आवाहन कवी दौंड यांनी पत्रामधून केले आहे.