श्रीरामपूर : नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत काही राजकीय नेते मर्जीतील लोकांना डोस देत आहेत, असा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला. ससाणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांना निवेदन देत संबंधितांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नगरपालिकेने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांच्या तारखावार याद्या तयार केल्या आहेत. त्यानुसार लसीकरण केंद्रावर डोससाठी संबंधितांना मोबाईलवर संदेश पाठवून बोलवले जात आहे. त्यामुळे केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यात यश आले आहे. मात्र, असे असले तरी एका मोठ्या नेत्याच्या वाहनचालकाने दबावतंत्राचा वापर करून यादीत समाविष्ट नसलेल्या एका मर्जीतील व्यक्तीला लस दिल्याचा प्रकार सोमवारी घडला. त्याला उपनगराध्यक्ष ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष संजय छल्लारे, सुहास परदेशी यांनी आक्षेप घेतला. मुख्याधिकारी गणेश शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनाही या व्यक्तीचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत नसल्याचे ससाणे यांनी सांगितले.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडे शासकीय कामात अडथळा आणल्याने संबंधितावर कारवाईची मागणी केली. हा सगळा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.