शिर्डी : मध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांवर साईनगरीत औषधोपचाराबरोबरच समुपदेशनाची मात्राही देण्यात येत आहे़. तालुका प्रशासनाने दिलासा प्रकल्पांतर्गत काही शिक्षकांच्या माध्यमातून रूग्णांच्या मनातील भीती घालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गुढीपाडव्याला या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला़.
गेल्या चार दिवसात पन्नासहून अधिक रूग्णांचे समुपदेशन करण्यात आले असून, समुपदेशनाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली़. सध्या रूग्णसंख्या व मृत्यूचाही आलेख धक्कादायक पद्धतीने उंचावत आहे़. अनेक रूग्णांच्या मनात भीती व चिंतेने घर केले आहे़. त्यामुळे मनाने व पाठोपाठ शरिराने खचून जाणारे धडधाकट रूग्ण अत्यवस्थ होत आहेत तर काहीजण दगावत आहेत़. त्यात रेमडेसिविर, खाटा, ऑक्सिजनच्या कमतरतेने रूग्णांना धडकी भरली आहे़. रूग्णांच्या मनातील भीती काढून त्यांना दिलासा दिल्यास तब्येतीत सकारात्मक व आश्चर्यकारक बदल होत आहेत,असे अनेक रूग्णांच्या अनुभवानुसार समोर आले आहे़. प्रशासन, आरोग्य विभाग, संस्थान तसेच लोकप्रतिनिधीही आपापल्यापरीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत़. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़. प्रमोद म्हस्के, डॉ़. गोकुळ घोगरे, डॉ़. शुभांगी कान्हे, डॉ़. स्वाती म्हस्के, साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ़. प्रीतम वडगावे, डॉ़. मैथिली पितांबरे, डॉ़. निहार जोशी आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांची टीम उभी केली आहे़. यात अरुण मोकळ, शांताराम शेळके, प्रा़. मंदाकिनी सावंत, प्रियंका गाडेकर, विलास काकडे, रमेश राऊत, वैभव गोसावी, मोहसिन शेख, राहुल पुरी, संजय राठोड, सतीश मुन्तोडे, राजू बनसोडे यांचा समावेश आहे.
...
शिक्षकांना प्रशिक्षण
तहसीलदार कुंदन हिरे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यात दिलासा प्रकल्प सुरू केला आहे़. सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ़. ओंकार जोशी यांनी यासाठी तालुक्यातील दहा शिक्षकांना समुपदेशनाचे प्रात्यक्षिकासह विशेष प्रशिक्षण दिले़. वैद्यकीय अधिकारी डॉ़. संजय गायकवाड यांनीही शिक्षकांना वैद्यकीय दृष्टीने टिप्स दिल्या आहेत.
....