जामखेड - राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात (वय ३०) व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २५) या दोघांची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.वर्षभरापूर्वी उल्हास माने यांच्या तालमीतील मुलांच्या बरोबर राजकीय बोर्ड लावण्याच्या कारणावरून गोविंद दत्ता गायकवाड (रा. तेलंगशी) व त्याच्यासोबत असलेल्या चार ते पाच लोकांनी नियोजित कट करुन मोटारसायकलवरून येऊन योगेश व राकेश यांच्यावर पिस्तूल मधून छातीवर गोळ्या झाडून ठार मारल्याची फिर्याद कृष्णा राळेभात यांनी जामखेड पोलिसांत दिली आहे. योगेश हा आष्टी येथे बी. एस.सीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून त्याला पत्नी व एक दीड वर्षाचा मुलगा आहे. राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २४) यास आईवडील व एक भाऊ आहे. शनिवारी (दि.२८) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जामखेड-बीड रस्त्यालगत बाजार समितीचे गाळे असून तेथील सोमा काळे याच्या चहाच्या हॉटेलवर योगेश हा राकेश राळेभात, सुरेश पवार व काही मित्रांसमवेत चहा घेत होता. सायंकाळी ६.४४ वाजण्याच्या सुमारास दिपक थोरे याच्या मोबाईलवरून फिर्यादीस भाऊ योगेश याला कोणीतरी पिस्तुलातून गोळ्या मारल्या आहेत असा निरोप आला. फिर्यादी ताबडतोब घटनास्थळी गेला असता गोळीबारात जखमी झालेला भाऊ योगेश व राकेश यांना जामखेड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. सरकारी दवाखान्यात योगेश गोळ्या लागून जखमी झाला असून त्याच्या छातीतून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यास दिसले. बाजूच्या कॉटवर राकेश राळेभात हा जखमी अवस्थेत पडलेला होता व त्याला देखील गोळ्या लागल्या होत्या. फिर्यादी त्याच्याशी बोलला असता, त्याने सांगितले की, गोविंद दत्ता गायकवाड (रा. तेलंगसी ता. जामखेड) व त्याच्यासोबत ४ ते ५ लोकांनी नियोजित कट रचून आमच्या जवळ मोटारसायकलवरती येऊन मला व योगेशला एक वर्षांपूर्वी उल्हास माने याच्या तालमीतील मुलाबरोबर राजकीय बोर्ड लावण्यावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून पिस्तूलमधून गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.कृष्णा राळेभात याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. रस्त्यावर असलेल्या दुकान चालकाचे पत्ते घेऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. संशयितांना ताब्यात घेतले घेऊन चौकशी सुरु आहे.
जामखेडमधील दुहेरी हत्याकांड पूर्व वैमनस्यातून, चार संशयित पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 7:16 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात (वय ३०) व राकेश ऊर्फ रॉकी अर्जुन राळेभात (वय २५) या दोघांची हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्याची फिर्याद योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देमयताच्या भावाकडून फिर्याद दाखल