शशिकांत व सिंधुताई दोघेही राहाता शहरातील मुलांना आदल्या दिवशी भेटून आले होते. शनिवारी(दि.२६) सकाळी नेहमीप्रमाणे शेती कामासाठी जाणारे दांपत्य आज का आले नाही म्हणून शेजारच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर या हत्याकांडाचा प्रकार समोर आला. त्यांनी लागलीच राहाता पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना हत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी घटनास्थळी रक्ताने माखलेले फावडे मिळून आल्याने फावड्याच्या साहाय्याने या वृध्द दांपत्याची हत्या झाली असल्याचे समोर आले.
श्वान पथक, फॉरेन्सिक पथक यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते पण अज्ञात मारेकऱ्यांचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस अधीक्षक संजय सातव यांनीही घटनास्थळी भेट देत या दुहेरी हत्याकांडाबद्दल चौकशी केली. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांनी सांगितले.
.......................
हत्या झालेले दांपत्य आपल्या शेतावरील घरात दोघेच राहात होते. त्यांची मुले राहाता येथे वास्तव्यास आहेत. उकाड्यामुळे घराचा एक दरवाजा उघडा ठेवून हे दांपत्य झोपले होते. रात्रीच्या सुमारास दोघेही गाढ झोपेत असताना त्यांची फावडे डोक्यात घालून हत्या केल्याच पोलीस तपासात निष्पन्न झाला.