अहमदनगर : जिल्ह्यातील जनता कर्फ्यूला १५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गत महिन्यात दोन वेगवेगळ्या आदेशान्वये लागू केलेले कडक निर्बंध १५ मेपर्यंत कायम राहणार आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे. दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. डबलसीट किंवा त्याहून अधिक व्यक्ती प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १४ दिवसांचा कडक लॉकाडाऊन करण्यात आला होता. त्याअनुषंगाने २१ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशालाच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे दिवसभर आणि रात्रभर संचारबंदी कायम राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला आणि किराणा विक्री करता येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत १० मेपर्यंत वेगळे नियम असल्याने नगर शहरात दूध विक्री वगळता सर्वच बंद राहणार आहे.
दरम्यान जिल्ह्यात दुचाकीवरून दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवरून एकापेक्षा अधिक व्यक्तींना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतंत्र आदेश जारी केला आहे. २ मेपासून ते १५ मेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. कोणत्याही संस्था, संघटना, व्यक्ती यांनी या आदेशाचे उल्लंघन करू नये. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी ही अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या सेवांना कडक निर्बंधातून सूट देण्यात आली होती, अशाच सेवांसाठी दुचाकीवरून एकापेक्षा जास्त जण प्रवास करीत असल्याचे दिसत होते. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने हा नियम केला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
-------
मार्केटयार्डमध्ये भाजीपाला, फळे विक्रीस मनाई
कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत नगरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट कमिटीच्या आवारात भाजीपाला, फळे विक्रीची सर्व दुकाने, तसेच इतर सर्व व्यावसायिकांची दुकाने बंद राहणार आहेत. हे निर्बंध १५ मेपर्यंत लागू राहणार आहेत. सदरची ही सर्व दुकाने नेप्ती उपबाजार समितीच्या आवारात सुरू करण्यास परवानगी करण्यात आली आहे. याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन करण्यास फौजदारी कारवाईचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे.