माजी प्राचार्य, लेखक, कवी, संशोधक असलेले डॉ. अनिल नागेश सहस्रबुद्धे हे २४ ऑगस्ट २०२१ रोजी ७५व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यिक कार्याची ओळख करून देणारा हा लेख.
-------------------
गुरुवर्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या पिढीतला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि आता भारतमातेचे पदार्पण अमृतमहोत्सवी वाटचालीत होत आहे. या पर्वकाळात २४ ऑगस्ट १९४७ रोजी आदिवासी क्षेत्रातील अकोले या गावी जन्मास आलेले डॉ. अनिल सहस्रबुद्धे हेही त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. अतिशय विपन्न परिस्थितीत त्यांना त्यांचे बालपण व्यतीत करावे लागले. कॉलेज जीवनाचा आस्वाद तर त्यांना घेताच आला नाही. मात्र एखाद्या जीवनव्रती योद्ध्याप्रमाणे त्यांनी घरादारातील आव्हाने स्वीकारीत आनंदमग्नतेने येथवरचा प्रवास सुकर केला आहे. एका दिवसासाठी का होईना शिपाई म्हणून काम केल्यानंतर १९६५ साली अगदी दुसऱ्याच दिवशी ते शिक्षक झाले ते तहहयात. सुरुवातीची वीस वर्षे मॉडर्न हायस्कूल, अकोलेमध्ये शिक्षकाचे सेवाकार्य करीत त्यांनी आपले पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तेथील ज्युनिअर कॉलेजमधून ते नगरमधील पेमराज सारडा महाविद्यालयात आले. १९८५ पासून २०७७ पर्यंत प्राध्यापक, प्राचार्य म्हणून सेवा करीत ते सेवानिवृत्त झाले.
त्यांचा पिंड समाजसेवेचा, कलावंताचा, अभ्यासू विद्यार्थ्याचा, अध्यापकाचा, साक्षेपी संशोधक आणि समीक्षकाचा तेवढाच कवी आणि ललित साहित्यिकाचा. बालवयात राष्ट्र सेवा दल आणि नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या राष्ट्रवादी संघटनांचे त्यांच्यावर संस्कार झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील आदिवासींसाठीचे वसतिगृह त्यांनी आपल्या घरात सुरू केले. आता त्याचा वटवृक्ष झाला आहे. ‘चाळीसगाव डांगाण परिसर : सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यास’ असा आंतरज्ञानशाखीय प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट संपादन केली. आंतरज्ञानशाखीय असा हा पहिला प्रबंध ठरला. कथा, कविता, कादंबरी, नाटके, ललित लेखन, समीक्षा, संशोधन, वैचारिक लेखन अशा साहित्याच्या सर्व प्रकारांमध्ये त्यांचे विपुल लेखन झाले. २४ ऑगस्ट रोजी ‘मनोस्वरूप विचार’ आणि ‘संतप्रबोधित मनोस्वरूप विचार’ असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत.
‘ज्ञानेश्वरीतील साहित्यविचार’ या ग्रंथास कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांकडून महाराष्ट्रातील निवडक नऊ विद्वानांमध्ये त्यांना विद्वत पुरस्कार मिळाला. हा त्यांना मिळालेला पहिला साहित्य पुरस्कार होय. साहित्य परिषदेसह विविध संस्थांकडून त्यांच्या साहित्यकृतींना अनेक पुरस्कार लाभले. त्यांच्या ‘लोकबंध’ ग्रंथास संशोधन पुरस्कार मिळाला तर ‘लोकनिष्ठ अध्यात्मवाद’ या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा तत्त्वज्ञाविषयक पुरस्कार यासह अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. विखे पाटील फौंडेशन, आदिवासी भांगरे प्रतिष्ठान, पुणे सार्वजनिक वाचनालय, नाशिक सार्वजनिक वाचनालय यांच्याकडूनही त्यांना साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार मिळाले. त्यांचे लोकसाहित्यविषयक, संतसाहित्यविषयक, समीक्षाविषयक, अभ्यासविषयक व ललित अशा स्वरूपातील ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांतर्गत स्वीकृत आहेत. ‘अगस्त्य’, ‘नारद’ या पौराणिक कादंबऱ्या, ‘डांगाणी’ ही आदिवासी सामाजिक कादंबरी तर ‘अहिनकुल’ ही आदिवासी ऐतिहासिक कादंबरी, ‘मातंगी’ आणि ‘सत्यनारायण थापाडे पाटील’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या व गाजत आहेत. तसेच त्यांनी लिहिलेले ‘जातकयज्ञ’ हे संगीत नाटक रंगभूमीवर लोकप्रियता मिळवत आहे. स्वतःच्या साहित्य सेवेबरोबरच त्यांनी स्फूर्ती प्रकाशन मंच आणि आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट या स्वतः स्थापन केलेल्या संस्थांमार्फत दोन वेळा सहकारी तत्त्वावर ग्रंथयाग केले. ‘अभंगपौर्णिमा’ प्रकल्प करून संत वाङ्मयाचा लोकबंधात्मक चिकित्सा कशी करता येईल असा प्रकल्प राबविला. नगर जिल्ह्याकरिता कविसंमेलन, आनंदमेळा घेऊन नगर जिल्ह्यातील काव्यविश्वाचे प्रदर्शन महाराष्ट्राला घडविले. अलीकडे त्यांनी राबविलेल्या ‘शोध पांडुरंगाचा’ या प्रकल्पाने पांडुरंगाचे प्राकट्य प्रथम कोठे झाले आणि नंतर विठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत कसे झाले? यावर प्रकाश टाकला आहे. सध्या ते ‘प्रवरा परिक्रमा’ असा प्रकल्प हाती घेऊन कार्यरत आहेत. शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक आणि राष्ट्रीय क्षेत्रामध्ये त्यांच्याभोवती चाहत्यांचे मोहोळ आहे. व्यक्तिनिष्ठेपेक्षा समूहनिष्ठा हे त्यांच्या कार्याचे सूत्र आहे. वैभवसंपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी ते सेवाव्रती आहेत. ७५व्या वर्षात पदार्पण करताना त्यांचे सर्व स्तरातून अभीष्टचिंतन होत आहे.
--
फोटो आहेत.
-