केडगाव : नगरमधील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. आर. जी. खोसे यांनी नुकतीच बोल्हेगाव येथील मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी प्राचार्य डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रा. विद्या पवार, प्रा. छाया पवार, भूगोल विभागाचे प्रा. एम. एल. कराळे, प्रा. डॉ. के. आर. पिसाळ, प्रा. एस. व्ही. मरकड, प्रा. एच. एस. सय्यद, प्रवीण दळवी यांच्या सोबत त्यांनी महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानास भेट दिली. भेटीदरम्यान उद्यानातील औषधी वनस्पती शतावरी, केवडा, हिरडा, बेल, कोरफड, सदाफुली, हळद, गवती चहा, अश्वगंधा, लिंबू, तुळसी, साग, कॅक्टस, आवळा आदी पाहून त्यांनी काही उपयुक्त सूचनाही दिल्या. वृक्षांचे निरीक्षण करत असताना डॉ. खोसे यांनी एका वृक्षाबद्दल तपशीलवार माहिती विचारली. हा वृक्ष एका रोपवाटिकेतून आणल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हा वृक्ष विदेशी असून, ‘फ्लोरा ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट’ या वनस्पती कोशामध्ये याची नोंद नसल्याचे सांगितले. हा देशी बदामाच्या कुटुंबातील वृक्ष ‘टरमिनीनेलिया आयव्होरेन्ससीस’ मूळचा आफ्रिकेचा निवासी असून, त्या खंडातील विविध देशांमध्ये कधीकाळी मोठ्या संख्येने दिसून येत होता, असे त्यांनी सांगितले. घुले पाटील महाविद्यालयाच्या वनस्पती उद्यानातील ही नवीन सहावी प्रजाती आहे. तीन वर्षांपूर्वी एका रोपवाटिकेतून आणलेला हा वृक्ष आता ताठ मानेने महाविद्यालयात उभा आहे.
---
०३ देशी बदाम
ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक डॉ. आर. जी. खोसे यांनी नुकतीच बोल्हेगाव येथील मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली.