-------------
पेमराज सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, ज्येष्ठ संगीत - संस्कृत तज्ज्ञ, हार्मोनिअम वादक, बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तथा नगर जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील मुकुटमणी डॉ. मधुसुदन बोपर्डीकर यांचे रविवारी (दि. १६) निधन झाले. लोकमत वर्धापन दिन विशेषांकासाठी स्व. बोपर्डीकर यांनी खास मुलाखत दिली होती. हीच मुलाखत वाचक व संगीतप्रेमींसाठी पुन्हा एकदा प्रसिद्ध करीत आहोत.
-----------------
शिक्षण घेण्यासाठी साधनं, सुविधा यासाठी नेहमीच झगडावं लागलं. नवी पुस्तकं कधीच वाट्याला आली नाहीत. ती गरिबीमुळे कधीच घेणं शक्यही झालं नाही. थोरल्या भावाची पुस्तक माझ्यासाठी ठेवली जायची. वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य तेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्धही नव्हतं. चिमण्या - कंदिलामध्ये अभ्यास करायचा. शिकायचं एवढीच जिद्द जवळ असायची. शाळेत जाण्यासाठी गणवेशाचीही गरज नव्हती. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना नोकरी करावी लागली. चित्रकला चांगली येत असल्याने पाटबंधारे खात्यात घोड कॅनॉल विभागात ‘ट्रेसर’ म्हणून ८० रुपये पगारावर नोकरी लागली. सकाळी कॉलेज आणि दुपारी नोकरी अशी धावपळ सुरू असायची. याच धावपळीमध्ये संगीत मनात रूजलं.
मूळ गाव वाई. घरची परिस्थिती बरी नसल्याने बहिणीकडे नगरला शिकायला आलो होतो. पायी चालणे हा कामाचा भाग होता. गरजा कमी असल्याने तेंव्हा ८० रुपयात भागायचे आणि निम्मे उरायचे. नगरमध्ये डॉ. कोपरकर संस्कृतचे अभ्यासक होते. त्यांच्याकडे मी संस्कृत शिकलो. मला संस्कृतचा वारसा घरातूनच मिळालेला होता. सर्वच शिक्षण इंग्रजीमधून झाले. संस्कृत विषय त्याकाळी इंग्रजीतून होता. डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषयामध्ये पीएच. डी. पूर्ण केली. त्यामध्ये विद्यापीठात प्रथम आलो. अगस्ती ऋषी हा प्रबंधाचा विषय होता. हा प्रबंधही संपूर्ण इंग्रजीतून आहे. प्रबंध लिहिण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. मात्र, त्याचे कधीच कष्ट वाटले नाहीत, की कधी शीण आला नाही.
डॉक्टरेट मिळाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेची जाहिरात आली होती. मुलाखत झाली आणि पंढरपूर कॉलेजमध्ये १३२ रुपये महिना पगारावर नोकरी, प्राध्यापकी सुरू केली. त्याचवेळी अर्धमागधी विषयाचेही अध्ययन झाले. तिथली नोकरी काही दिवसातच संपली आणि पुन्हा बेकारी वाट्याला आली. संस्कृत, अर्धमागधी आणि प्राचीन भारतीय इतिहास या तिन्ही विषयांमध्ये एम. ए. केले.
आधी नगर कॉलेजमध्ये प्राध्यापकी आणि नंतर पेमराज सारडा महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. नगर कॉलेजमध्ये असताना रामायण, महाभारतावरील संगीतिका लिहिल्या. त्याचे प्रयोग सादर केले. त्यासाठी रात्री जागून काढल्या. जे काही करायचं ते उत्तमपणे, यासाठी माझा जीव ओतून काम करायचो. त्यामुळेच यश सहजपणे मिळायचे.
सारडा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना नवे उपक्रम सुरू केले. त्यावेळीही गुंडगिरी चालत होतीच. पण त्यांना प्रेमानं हाताळले. म्हणून प्राचार्य म्हणून काम करताना कोणत्याच गोष्टीचा त्रास झाला नाही. विद्यार्थ्यांनी भरपूर प्रेम दिलं. प्राचार्य असताना विद्यापीठाने अनेक समित्यांवर काम करण्यासाठी बोलविले. मात्र, जाणीवपूर्वक कोणत्याही समितीवर काम केले नाही. जे पद आहे, त्यालाच शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला.
संस्कृत हे जसे वडिलोपार्जित तसे संगीतही. पंडित भीमसेन जोशी यांच्या मैफिली नेहमीच ऐकायचो. संगीत ऐकता ऐकता उपजतपणे विकसित होत गेले. थोरल्या भावाचा संगीताचा वर्ग होता. त्यामुळे २४ तास संगीत अंगात मुरायचं. वाईला असताना सर्व भाऊ मिळून आम्ही मेळे काढायचो. त्याला चांगला प्रतिसाद मिळायचा. संवाद, गाणी, नृत्य हे सगळे आम्ही बसवायचो. तबला, पेटी आणि सायकल हे माझे जीव की प्राण होते. सायकलसुद्धा हप्त्यानेच घेतली होती. पंढरपूरला प्राध्यापकाची नोकरी लागली त्यावेळी आधी या तीन वस्तू मी पंढरपूरला घेऊन गेलो होतो. माणिक वर्मा यांनी विठ्ठल मंदिरात गायन केले होते. त्यावेळी त्यांना हार्मोनिअमची साथ देण्याचे भाग्य माझ्या वाट्याला आले होते. तो पहिला प्रसंग अजूनही प्रेरणादायी आहे. मामासाहेब दांडेकर, धुंडा महाराज देगलुरकर यांचा सहवास लाभला, हेच माझे मोठे भाग्य आहे. नगरला परत आल्यानंतर डॉ. देविप्रसाद खरवंडीकर यांच्या सहवासाने संगीताच्या काही परीक्षा दिल्या. साधना हाच संघर्ष होता. हार्मोनिअम वादनाचा ध्यास होता. विद्यार्थी गुरुस्थानी होते. पु. लं. देशपांडे हे एक सांगीतिक व्यक्तिमत्त्व होतं. ते स्वत: गायकही होते. त्यांचे कार्यक्रम पुण्यात अनेकवेळा ऐकले. संस्कृत सेवा संघ, स्वरानंद प्रबोधिनी, रियाज मंच, बंदिश असे कितीतरी उपक्रम सुरू केले आहेत. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आताही धडपड सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक मंचाचा संस्थापक अध्यक्ष राहिलो आहे.
गरिबी हे माझ्यासाठी वरदान ठरले आहे. आजकाल सर्व काही रेडिमेड मिळते. नवीन पिढी टॅलेंटेड आहे. मात्र, रियाज त्यांच्या अंगी नाही. काही गोष्टी घोटून अभ्यासाव्यात असं त्यांना काहीच वाटत नाही. चांगलं निर्माण करायचं असेल तर घाम गाळावा लागतो. ‘यमन’ राग २० वर्षे मी घोटला. असा घोटीवपणा आजकाल नाही. शिक्षकांना आजकाल शिकवावे, असे वाटत नाही. मुलांची जिज्ञासा पूर्ण करता आली पाहिजे. त्यामध्येच शिक्षक कमी पडत आहेत. संस्कृतचा अभ्यास करताना संगीताची आवड निर्माण झाली. पेटी वाजविण्यासाठी घेतली की, स्वर्गीय आनंदाची अनुभूती मिळते. ही अनुभूतीच जगण्याचा आनंद देते.
---------
फोटो- १६मधुसूदन बोपर्डीकर
शब्दांकन : सुदाम देशमुख