या अभियानाची सुरुवात रोजगार हमी (रोहयो)अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील प्रभावी काम करणार्या रोजगार सेवक व तालुक्यातील प्रभावी तांत्रिक सहायक (पीटीओ) यांच्या झूम मीटिंगवरील बैठकीने नुकतीच करण्यात आली.
राज्यातील ३५१ तालुके व प्रत्येक तालुक्यातील एका गावात १०० टक्के शोषखड्डे तयार करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १४ गावांत ६ हजार ३१२ घरांच्या परिसरात ४ हजार ४ शोषखड्डे तयार करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी बंदिस्त गटारीची सोय नाही, अशा घरांसमोर रोहयोच्या कामातून हा शोषखड्डा खणला जाणार आहे. खड्डा खणण्याची मजुरी आणि त्यासाठी लागणारा पाइप याचा खर्च संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणार आहे. अनुदान मिळणार असल्याने, अधिकाधिक लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. अनेकदा घरातील सांडपाणी उघड्यावर सोडले जाते. त्यामुळे ते जमिनीत मुरत नाही. परिणामी, वाया जाते किंवा परिसरात डबके साचून अस्वच्छता पसरते. त्यामुळे घराघरातील हे पाणी जमिनीत मुरण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय एखाद्या गल्लीतील सामूहिक गटारीचे पाणी वाहून नेण्याची सोय नसेल, तर अशा ठिकाणी सामूहिक शोषखड्डा करण्याचे कामही या योजनेत करण्यात येणार आहे.
या अभियानाचा उद्देश शोषखड्डयांच्या माध्यमातून भूगर्भातील पाणी पातळी वाढवून जलसंधारण करण्याचे आहे.
-----------
या गावांत होणार शोषखड्डे
भोलेवाडी (अकोले), तेलंघशी (जामखेड), थेरगाव (कर्जत), सांगवी भुसार (कोपरगाव), खडकी (नगर), जळके खु (नेवासा), प्रिंपी जलसेन (पारनेर), जांभळी (पाथर्डी), अस्तगाव (राहाता), कंदळ खु (राहुरी), वरुडी पठार (संगमनेर), माळेगाव शे. (शेवगाव), मुंगुसगाव (श्रीगोंदा), भामाठान (श्रीरामपूर) या गावांची अभियानासाठी निवड करण्यात आली आहे.