राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आले होते़. बुधवारी दुपारी नदीपात्रात असलेला मानोरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या बंधा-यातून पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने झेपावले आहे़.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती़. त्यामुळे पाण्याची आवक ५०० क्युसेकवरून ७७५ क्युसेकवर वाढली़. मुळा धरण पुन्हा परवा १०० टक्के भरले़. मुळा धरणात २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे़. कोतूळ बरोबरच पारनेर भागातील पाणीही धरणाकडे येत आहे़. मात्र कोतुळप्रमाणे पारनेर तालुक्यातून येणा-या पाण्याचे मोजमाप होत नाही़.मुळा नदीपात्रात असलेला डिग्रस बंधारा परवाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला़. याशिवाय मानोरी येथील बंधारे तत्परतेने भरावेत म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आला होता़. ११ मो-यातून प्रत्येकी २०० क्युसकने पाण्याचा विसर्ग सुरू होता़. मंगळवारी रात्री १ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता़. दुपारी १ वाजेनंतर विसर्ग पूवर्वत ११०० करण्यात आला आहे़.
मुळा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर कोणत्याही बंधा-याला धोका नाही़. मानोरी बंधारा ओव्हरप्लो झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे़. पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने जात आहे़. मांजरी येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा भरल्यानंतर त्याखाली असलेला वांजुळपोई बंधारा पाण्याने भरण्यात येणार आहे़. बंधा-यांमध्ये फळ्या टाकण्यात आलेल्या आहेत़. बंधारे भरल्यानंतर पाणी फळ्यावरून नदीपात्रात जाते़. १० हजार क्युसेकने पाणी सोडले तरी बंधा-याला धोका नाही़.-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, अभियंता.