----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिकेची मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम गेल्या वर्षभरापासून ठप्प आहे. शहरासह उपनगरांतील रस्त्यांवर मोकाट जनावरांची संख्या वाढल्याने रस्त्यावर अपघात होत असून, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
शहर व परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. मोकाट जनावरे रस्त्यावर येऊन बसतात. काहीवेळा तर रस्त्यातच जनावरे विश्रांती घेतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. शहरातून रुग्णवाहिकांची वर्दळ असते. ही जनावरे रुग्णवाहिकांसाठी मोठा अडथळा ठरतात. मोकाट जनावरांबाबत मध्यंतरी नगरसेवकांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर पुणे येथील संस्थेने एक महिनाभर मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविली. परंतु, संबंधित संस्थेनेही जनावरे पकडण्याची मोहीम आखडती घेतली. सध्या मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम पूर्णपणे बंद असल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात होतात. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. जनावरे अचानक रस्त्यावर येत असल्याने अपघात होत असून, महापालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
या मार्गांवर वाहने सावकाश चालवा
- नेप्ती नाका रोड
- सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोड
-स्टेट बँक चौक रोड
- बंगाली चौक
- मार्केटयार्ड परिसर
- पाईपलाईन रोड
-कुष्ठधाम रोड
-प्रोफसर चौक रस्ता
- पारिजात चौक परिसर
-सर्जेपुरा रस्ता
- आयुर्वेद रोड
....
मोकाट जनावरांना वाली कोण
शहर व परिसरात अनेक जनावरे रस्त्यावर फिरताना दिसतात. पाळीव जनावरे मालक सोडून देतात. ही जनावरे रस्त्यावर फिरत असून, मिळेल ते खातात. त्यात मध्यंतरी एका गायीच्या पाेटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले होते. त्यामुळे जनावरांचे आरोग्यही यामुळे धोक्यात आले असून, अशा जनावरांना वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
.....
वर्षभरात २५ कारवाया
महापालिकेची मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम ठप्प आहे. महिनाभर प्रायोगिक तत्वावर ही मोहीम राबविण्यात आली होती. मात्र ही मोहीम बंद आहे. वर्षभरात केवळ २५ जनावरांवर कारवाई करण्यात आली आहे.
....
जबाबदार कोणाला धरायचे
शहरातील मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अपघात होत असून, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत महापालिकेचे कोंडवाडा विभाग प्रमुख बाळासाहेब विधाते यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या महिनाभरात प्रायोगिक तत्वावर मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मोकाट जनावरे पकडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
....
सूचना: साजिद फोटो देणार आहे.