घारगाव ( अहमदनगर) : गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात काही उंचीवर चमकणाऱ्या ड्रोनच्या घिरट्यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. वाड्या वस्त्यांवर ड्रोन फिरत असल्याचे सोशल मीडिया, फोनच्या माध्यमातून चर्चा सुरू आहेत. मात्र, सोमवारी दि. 23 रात्री तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत येठेवाडी ते शिरोळे मळा परिसरात एक ड्रोन विद्युत वितरणाच्या पारेषण कंपनीच्या उच्च दाबाच्या टॉवरला धडकून खाली पडला. हे घटना ग्रामस्थांनी प्रत्यक्ष पाहिली.
याबाबतची माहिती ग्रामस्थांनी तहसीलदार धीरज मांजरे यांना दिल्यानंतर त्यांनी घारगाव पोलिसांना पाचारण केले. पठार भागातील खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, डोळासणे, घारगाव, कुरकुंडी, बोटा आदी गावांच्या परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत असल्याचे नागरिकांना दिसत होते. असे ड्रोन दिसताच जवळपासच्या गावांत संपर्क साधून नागरिक हे माहिती जाणून घेत होते. चार ते पाच ड्रोन फिरत असल्याचेही अनेकांनी पाहिले होते. याबाबत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलिसांशी अनेकांनी संपर्कही साधला. कुरकुंडी येथे युवकांनी संबंधित ड्रोन कुठे उतरते, कोण उडवत आहे याचा तपास घेतला. मात्र, त्यांना कोणीही आढळून आले नाही. अशी परिस्थिती असताना सोमवारी रात्री येठेवाडी परिसरात ड्रोन टॉवरला धडकून कोसळल्याने एकच खळबळ उडाली.
येठेवाडी येथील गट नंबर ५०८मध्ये ड्रोन कोसळला. आजूबाजूचे ग्रामस्थ कसला प्रकाश आहे हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना ड्रोन आढळून आला. ग्रामस्थांनी तलाठी युवराज सिंह जारवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ तहसीलदार धीरज मांजरे यांना कळविले. तहसीलदार मांजरे यांनी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी पाचारण केले. दरम्यान, ग्रामस्थांनी पडलेल्या ड्रोनच्या भोवती गर्दी केली होती.