अहमदनगर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन सदस्यीय पथकाने आज पाहणी केले. या पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड भागातील टंचाई परिस्थितीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला.केंद्रीय विभागाचे सहसंचालक सुभाषचन्द्र मीना यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्य पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकात पशुधन व दुग्धविकास विभागाचे एल.जी. टेंभुर्ण, विजय ठाकरे यांचा समावेश आहे. राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह हेही या पथकासोबत होते. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनीही पथकाशी चर्चा करुन जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली.पथक जिल्ह्यात आज दुपारी औरंगाबाद मार्गे दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी शेवगाव तालुक्यातील तळणी शिवारातील विष्णु शंकर सातपुते या शेतक-यांच्या शेतात भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कपाशी आणि तूर पिकाची पाहणी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती तसेच त्यामुळे परिस्थितीवर झालेला परिणाम आगामी पाणीपुरवठा पाणी पुरवठा होणारा परिणाम पशुधन व चा-याची व्यवस्था या अनुषंगाने संपूर्ण माहितीचा अहवाल सादर करण्यात आला. या पथकाने नंतर पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील शिवारातील पिकांची पाहणी केली. स्थानिक पदाधिकारी, शेतकरी यांनी, पावसाअभावी पिकांची परिस्थिती बिकट असल्याचे पथकाच्या निदर्शनास आणून दिले. केंद्र शासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली. येथील कोरड्या पडलेल्या पाणीपुरवठा तलावाची पाहणी केली. यानंतर या पथकाने जामखेड आणि कर्जत तालुक्यातील काही गावांची पाहणी केली.
केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 4:55 PM