अहमदनगर : जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे छायाचित्रण करण्यासाठी उडविण्यात आलेले ड्रोन थेट लष्करी हद्दीत जाऊन पडले. लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव हे ड्रोन पाडले की ते आपोआप पडले याबाबत संभ्रम असून ड्रोनचा शोध सुरू आहे.शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता येथील भूईकोट किल्ला परिसरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते वन विभागाने नगर क्लबसमोरील किल्ला परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्हा प्रशासन व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुुरू होता. त्याचे छायाचित्रण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था खासगी छायाचित्रकाराकडून करण्यात आली होती. याचदरम्यान ड्रोन कॅमेरा मर्यादेपेक्षा जास्त उंचीवर गेल्याने त्याचा संपर्क तुटला. तो जवळच असलेल्या लष्करी हद्दीत पडला.त्यानंतर मात्र अनेक चर्चांना उधाण आले. लष्कराच्या हद्दीत गेल्याने हा ड्रोन लष्करानेच जप्त केला अशीही चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे हा ड्रोन जास्त उंच गेल्याने संपर्क तुटून भरकटल्याचे सांगितले गेले. दरम्यान, याबाबत अधिकृत माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
वृक्षारोपणाचे फोटो काढणारा ड्रोन लष्करी हद्दीत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:53 PM