सुदाम देशमुख / अहमदनगर : ज्यावेळी रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते, त्या लॉकडाऊनच्या काळात फक्त औषधांचीच दुकाने उघडी होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक डॉक्टरांचे दवाखाने बंद होते, तर रुग्णालाही तपासण्यास अनेक डॉक्टर घाबरत होते. या काळात १२ ते १४ तास सेवा देऊन औषध विक्रेते कोरोना वॉरिअर्स बनले. या काळात मास्क, सॅनिटायझरची विक्री झाली तरी अन्य औषधांना मागणी नव्हती. लॉकडाऊनच्या काळात फक्त मधुमेह, रक्तदाब, शुगर या आजारांवरील औषधांचीच विक्री झाली. त्यामुळे नेहमीपेक्षा ५० टक्के विक्री घटल्याने औषध विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाला. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन अत्यंत कडक होता. या टप्प्यात फक्त औषध विक्रीचीच दुकाने उघडी होती. औषधांची ने-आण करताना अनेक औषध विक्रेत्यांना पोलिसांच्या काठ्या खाव्या लागल्या. तरीही सेवा चालू ठेवण्याचाच निर्धार विक्रेत्यांनी केला. तब्बल दोन महिन्यांपासून अनेक हॉस्पिटल बंद होती. अनेक डॉक्टरांचे बाह्य रुग्ण विभागही बंद होते. लोकांचे बाहेरचे खाणे, पिणे, फिरणे बंद झाल्याने आजाराचे प्रमाणही कमी झाले. त्यामुळे औषधांच्या विक्रीला फटका बसला. मधुमेह, शुगर, रक्तदाब यावरील औषधांचीच फक्त विक्री झाली. मास्क, सॅनिटायझरला मोठी मागणी होती. काही विक्रेत्यांनी मनमानी किमती आकारल्या. त्यावेळी संघटनेने त्यावर नियंत्रण आणत परिस्थितीचा गैरफायदा न घेण्याचा निर्धार केला. अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ तास दुकाने उघडी ठेवली.वाटसरुंना दिले जेवणऔषध विक्रीसोबतच लॉकडाऊनच्या काळात विक्रेत्यांनी अनेकांना मदत केली. पोलिसांना मास्क, सॅनिटायझर दिले. कोतवाली पोलीस ठाण्यात २५० पोलिसांना ‘हिपाटायटीस बी’चे लसीकरण केले. नागरिकांनी हॅण्डवॉश करावेत, यासाठी जागृती केली, विक्रेत्यांनी दुकानासमोर तसे फलक लावले. प्रिस्क्रीप्शनशिवाय सर्दी-खोकल्याच्या गोळ््या-औषधे कोणालाही दिली नाहीत. मास्क ५० रुपयांच्या पुढे न विकण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला. महामार्गावर पायी येणाºयांना चार-पाच दिवस सलग जेवण दिले. पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने ही कामे केली, असे संघटनेचे सदस्य देविदास काळे यांनी सांगितले.विक्रेत्यांनाही वाटले होते घरी बसावेलॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण आपल्या कुटुंबासोबत होता, घरात होता. दुकाने बंद ठेवून घरीच बसावे, असे औषध विक्रेत्यांच्या कुटुंबीयांनाही वाटत होते. अशावेळी सुरवातीच्या काळात औषधांची ने-आण करताना अनेक विक्रेत्यांना त्रास झाला. त्यात पुणे, नाशिकमध्ये विक्रेते कोरोनाबाधित आढळले. अशावेळी दुकान बंद करण्याचा विचार आला. मात्र संघटनेने आमचे मनोधैर्य उंचावले, म्हणून दुकान उघडे ठेऊ शकलो, असे विक्रेते मनोज खेडकर यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात शहरातील ११०० ते १२०० औषध विक्रेत्यांनी अविरत सेवा दिली. औषध विक्रेते हे सुद्धा कोरोना वॉरिअर्स आहेत. संकटकाळात व्यवसाय, आर्थिक फायद्यापेक्षा सेवा देण्यावर भर होता. पहिल्या टप्प्यात पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. नंतर मात्र पोलिसांचे खूप सहकार्य मिळाले, म्हणून लोकांची सेवा करू शकलो. पुण्यामध्ये ३८ औषध विक्रेत्यांना, तर नाशिकमध्ये पाच ते सहा औषध विक्रेत्यांना कोरोना झाला. मात्र नगरमध्ये सर्व विक्रेत्यांनी काळजी घेत सेवा केल्याने एकही संशयितसुद्धा झाला नाही, हेच मोठे समाधान आहे. -दत्ता गाडळकर, अध्यक्ष, शहर केमिस्ट असोसिएशन