अहमदनगर : दारूच्या नशेत भांडण झाल्यानंतर मित्राचा गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पुलाखाली फेकून देणाºया आरोपीला अखेर नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (वय ४८, रा. बुरुडगाव रोड अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. म्हस्के याने त्याचा मित्र रघुनाथ एकनाथ बर्डे (वय रा.४०, नालेगाव,नगर) याचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.नगर-कल्याण रोडवरील नेप्ती शिवारातील पुलाखालील मोरीत १८ एप्रिल रोजी एक कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले तेव्हा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी तपास सुरू केला. तेव्हा अशी माहिती मिळाली की, मच्छिंद्र म्हस्के हा घटनेपूर्वी मयत रघुनाथ बर्डे यांच्यासोबत नेप्ती शिवारात दिसला होता. म्हस्के याला पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. मयत रघुनाथ आणि मच्छिंद्र म्हस्के घटनेच्या काही वेळ आधी नेप्ती परिसरात दारू पिले होते. यावेळी दोघांचे भांडण झाले. या वादातूनच म्हस्के याने रघुनाथ याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पुलाखाली असलेल्या मोरीत फेकून दिला होता.जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी शंकरसिंग राजपूत, उपनिरीक्षक रितेश राऊत, धनराज जारवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने, रावसाहेब खेडकर, पोलीस नाईक अशोक मरकड, राहुल शिंदे, बाळू कदम, प्रमिला गायकवाड, ज्ञानेश्वर खिळे, धर्मराज दहीफळे यांच्या पथकाने हा तपास केला.मयताची डीएनए चाचणीमयत रघुनाथ बर्डे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आल्याने ओळख पटविणे अवघड होते. नालेगाव येथील बर्डे कुटुंबातील एक जण घरातून बेपत्ता असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हा मृतदेह मयताची पत्नीला दाखविला होता. याबाबत सदर महिलेने हा आपला पती असल्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी मयताची डिएनए चाचणी केल्यानंतर हा मृतदेह रघुनाथ एकनाथ बर्डे याचाच असल्याचे समोर आले.
दारूच्या नशेत आवळला मित्राचा गळा; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 2:51 PM