शेवगाव : तालुक्यातील सुलतानपूर बुद्रूक (मठाची वाडी) येथील ग्रामसभेत ग्रामस्थ व महिलांनी दारूबंदीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने अवैद्य दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला़ दारु पिणा-यास ५०० रुपये दंड व दारु पिणा-याचे चित्रीकरण करुन पुरावा देणा-यास ५०० रुपये बक्षिस अशी योजनाही सरपंच सतीश धोंडे यांनी जाहीर केली़ सरपंच सतीश धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली दारु बंदीसाठी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. गावात अधिकृत परवानाधारक दारू विक्रीचे दुकान नसताना गावाच्या हद्दीवर अवैद्य दारू विकली जात होती. त्यामुळे दारु पिऊन हाणामारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती़ अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले होते़ त्यांचे संसार उघड्यावर आले होते़ तळीरामांना लगाम बसावा, या हेतूने ग्रामसभेने दारुबंदीचा ठराव घेतला़ यावेळी महिलांनी अवैद्य दारू विक्री करणा-यावर गुन्हे दाखल करावा, अशी मागणी केली. राज्य उत्पादन शुक्ल व शेवगाव पोलिसांना अवैध दारु विक्रेत्यांची माहिती देण्यात आली असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले़ त्यांच्यावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे़ आता दारु पिणा-यांवर कारवाई करण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला़ यावेळी उपसरपंच संजय जगदाळे, पोलीस पाटील आबा वाघ, बबन जगदाळे, बाळासाहेब धोंडे, संतोष वाघ, आत्माराम घुले, आप्पासाहेब सुकासे, आशीष लोखंडे, शिवाजी जगदाळे, कडूबाई गहाळ, आशा शिरसाठ, लक्ष्मी नवथर, शोभा पंडीत, सुनिता गहाळ, सुशिला मांढारे, अलका व्यवहारे, सुलगाबाई नागे, आशाबाई भवर आदी उपस्थित होते.
सुलतानपूरला दारूबंदी; तळीराम दाखवा बक्षीस मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 3:19 PM