सुपा : पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील ग्रामपंचायतीने ग्रामविकास विभागामार्फत दिला जाणारा ‘आर. आर. पाटील सुंदर गाव’ पुरस्कार पटकाविला आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा नगर येथे पार पडला. निर्धारित निकषांमध्ये वाळवणे गावाने सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने या पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती सरपंच जयश्री पठारे व उपसरपंच सचिन पठारे यांनी सांगितले.
यापूर्वी सुपा परिसरातील आपधूप ग्रामपंचायतीने निर्मलग्राम पुरस्कार पटकावला होता. तो त्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला होता. आता राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी वाळवणेची निवड झाल्याने ग्रामपंचायतीचा हा बहुमान मिळविणारे वाळवणे दुसरे गाव ठरले आहे. गावाला पुरस्कार मिळवून देण्यासाठी परिश्रम करणारे विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य यांच्याबरोबरच यापूर्वीचे माजी सरपंच उत्तम तात्या पठारे, त्यांची टीम यांचे योगदान आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले आदी प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सरपंच जयश्री पठारे, उपसरपंच सचिन पठारे, माजी सरपंच उत्तमराव पठारे, सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. गावाला मिळालेल्या पुरस्काराने ग्रामस्थांना या पुढील काळात अधिक चांगले काम करण्याचे बळ मिळाले आहे, असे ग्रामपंचायत सदस्य सुरेश थोरात यांनी सांगितले.
फोटो १७ वाळवणे
ग्रामविकास विभागामार्फत दिला जाणारा ‘सुंदर ग्राम’ पुरस्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते स्वीकारताना वाळवणेचे सरपंच जयश्री पठारे, उपसरपंच सचिन पठारे, माजी सरपंच उत्तमराव पठारे, सदस्य व इतर.