अहमदनगर : गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या इमारतीत सुरू असलेली भूसंपादन विभागाची सहाही कार्यालये भाडे थकल्याने बंद करण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिल्याने आता भूसंपादन शाखा डीएसपी चौकातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत हलवण्यात येणार आहे.वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टाजवळील इमारतीत मागील सहा वर्षांपासून भूसंपादन विभागाची क्रं. १, ३, ७, १३, १४, १५ अशी सहा कार्यालये सुरू होती. त्यांना स्वतंत्र्य उपजिल्हाधिकारी आहेत. परंतु या कार्यालयाचे भाडे जिल्हा क्रीडा कार्यालयाला मिळाले नसल्याने ही कार्यालये ४८ तासांत खाली करावी, अन्यथा क्रीडा कार्यालय या इमारतीचा ताबा घेईल, अशी नोटीस नूतन जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांनी भूसंपादनला बजावली होती. विशेष म्हणजे भूसंपादन शाखा जिल्हा प्रशासनाच्या अधिपत्याखाली आहे आणि जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. त्यांच्याच दूरध्वनी आदेशाने जागा खाली करण्याची नोटीस काढण्यात आली.इतरांच्या जागेचे भूसंपादन करून जमीन खाली करून घेण्याचे काम करणाऱ्या भूसंपादन शाखेलाच आता आपल्या कार्यालयाची जागा खाली करून देण्याची नामुष्की ओढवली. भूसंपादन व जिल्हा क्रीडा कार्यालय ही दोन्ही सरकारी कार्यालये असताना समन्वयातून मार्ग काढण्याऐवजी थेट जागा खाली करण्याच्याच नोटिसाच काढल्या गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भूसंपादन विभागाची कार्यालये वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलाच्या इमारतीत होती. या कार्यालयाच्या भाड्याबाबत अद्याप रक्कम निश्चित केलेली नाही. परंतु क्रीडा कार्यालयाकडून इमारत खाली करण्याबाबत नोटीस आल्याने आम्ही ही सर्व कार्यालये खाली करत आहोत. डीएसपी चौकातील सरकारी इमारतीत नवीन जागा मिळण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोलणे झाले आहे. त्यामुळे तेथे भूसंपादन शाखा हलवली जाणार आहे. - अजय मोरे, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन