राहुरी : भगवान श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र तांभेरे येथे उत्सवाला फाटा देण्यात आला. श्रीराम मंदिरात विधीवत जलअभिषेक करण्यात आला. भाविकांनी घरोघरी श्रीराम यांची प्रतिमा ठेवून पूजन केले. कोरोनामुळे दरवर्षी होणारे कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले होते. भगवान श्रीराम यांनी श्रीक्षेत्र तांभेरे येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख भक्तीविजय या ग्रंथात आहे. गुढीपाडव्यापासून रामनवमी उत्सव नवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाची दरवर्षी आयोजन केले जाते. यंदा श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे शासकीय नियमांचा आदर करीत गावकºयांनी यंदा श्रीराम उत्सव उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीराम मंदिरात गुरुवारी (२ एप्रिल) साध्या पद्धतीने राजू किरण आणि प्रभाकर ठोंबरे यांनी जल अभिषेक केला. रामायण ग्रंथ व आरती झाल्यानंतर भाविकांनी घरोघरी श्रीराम उत्सव साजरा केला. भाविकांनी श्रीरामाचा फोटो ठेवून पूजा, आरती केली असे तांभेरे येथील सेवानिवृत्त सैनिक ताराचंद गागरे यांनी सांगितले.
कोरोनामुळे तांभेरे येथे घरोघरी श्रीराम जन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 2:15 PM