राहुरी : तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे.विष्णू जाधव हे घासावर मावा पडला म्हणून औषधाची फवारणी करीत होते़ औषध फवारणी करत असताना जाधव यांना चक्कर येऊन ते तेथेच कोसळले. खूप वेळ झाले तरी ते घरी आले नाही, म्हणून त्यांचे नातेवाईक शेतात त्यांना पाहण्यासाठी आले. त्यावेळी जाधव हे शेतात बेशुध्द अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील शेतक-यांनी राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले.हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात उशीर झाल्याने उपचार सुरू असताना विष्णू जाधव यांचे निधन झाले. जाधव यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.
मृत्यूबाबत तर्कविर्तक..
मयत विष्णू जाधव यांचा मृत्यूबाबत टाकळीमियाँ परिसरात तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे़ जाधव यांच्यावर सावकाराचे कर्ज होते. आर्थिक विवेचनामुळे आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मयताच्या पोटात विष आढळून आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे औषध फवारणीमुळे मृत्यू झाला की विषारी औषध घेऊन झाला याबाबत तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास प्रभाकर शिरसाट हे करीत असून राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.