कोतूळ : वीस बावीस वर्षांपूर्वी दहावीच्या मराठीच्या पुस्तकात शेतकऱ्यांच्या जीवनातील वास्तव दाखविणारी ‘लाल चिखल’ नावाची भास्कर चंदनशिवे यांची ग्रामीण कथा कोतूळमध्ये प्रत्यक्षात रस्त्या रस्त्यावर दिसू लागली आहे.अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरातील भोळेवाडी, मोग्रस, पांगरी, कोतूळ, आंभोळ, पैठण, बोरी, वाघापूर, लहीत, चास, पिंपळदरीसह तालुक्यातील मुळा नदी काठावरील शेतकरी गेल्या पंधरा वीस वर्षांपासून टोमॅटो व कोबी या पिकांवर अवलंबून आहे. येथील सुमारे दोन तीन हजार एकर शेती उन्हाळी व पावसाळी टोमॅटो पिकाखाली येते. उन्हाळ्यात टोमॅटो पीक घेण्यासाठी कमी पाणी असलेल्या कोरडवाहू भागातील अनेक शेतकरी येथे वाट्याने शेती करतात. त्यामुळे या परिसरात किराणा, कापड, खते औषधे, बांबू , असे अनेक व्यवसाय वाढीला लागले आहेत. सध्या या परिसरात किमान दोनशेच्या वर कृषी निविष्ठांची दुकाने आहेत.भाव नसल्याने शेतक-यांनी टोमॅटो तोडून रस्त्याच्या कडेला फेकले आहेत. त्यामुळे परिसरातील रस्ते अगदी लालभडक दिसत आहेत. त्यामुळे भास्कर चंदनशिवे यांच्या कथेतील बापू टोमॅटोला भाव नसल्याने जसा भर बाजारात टोमॅटोच्या ढिगाºयावर नाचला व लाल चिखल झाला तसाच प्रसंग परिसरातील शेतक-यांवर ओढावला आहे.टोमॅटोला यंदा पावसाळी व उन्हाळी दोन्ही हंगामात बाजार न मिळाल्याने या परिसरातील सर्वच व्यावसाय मोडीत निघाले आहेत. सध्या उन्हाळी हंगामात प्रतिकूल वातावरणात एकरी लाख रूपये खर्च करून बहारदार पीक आणले. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा टोमॅटो दोन ते तीन रूपये किलो दराने खरेदी होत आहे. सलग सहा महिने भाव नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनेक वाटेकरी फड सोडून पळून गेले. तर शेतकºयांना कृषी दुकानदारांची बाकी देखील देता येणे अशक्य झाले आहे.माझे पाच एकर टोमॅटो आहेत. त्यासाठी पाच ते सहा लाख रूपये खर्च झाला. तीन वाटेकरी आहेत. दर दिवसाला पाचशे ते सहाशे खोके माल निघतो. प्रती खोके ऐंशी नव्वद रूपये दराने जाते. सर्व खर्च वजा केला तर एकही रूपयाही शिल्लक राहत नाही. व्यापारी देणी देण्याएवढेही पैसे झाले तरी समाधान होईल. -शिवाजी तुकाराम देशमुख, शेतकरी.