घोडेगाव : कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याचे भाव कमी मिळत असल्याने शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. सकाळी साडेअकरा वाजता शेतकरी लिलाव बंद पाडून थेट नगर -औरंगाबाद राज्यमार्गावर ठिय्या देऊन बसला.‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही,’ अशा घोषणा देत राज्यमार्ग तब्बल अडीच तास बंद केला. बुधवारी मार्केटला ३ हजार २०० रुपये प्रती क्विंटल भाव निघतो. मग अचानक कसा कमी झाला. नगरला दोन हजारच्या पुढे भाव मिळतो मग घोडेगावमध्ये का नाही, असा प्रश्न शेतक-यांनी मांडला.या शेतक-यांनी नायब तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, नेवासा पी.आय.डॉ.शरद गोर्डे, कैलास देशमाने, नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव देवदत्त पालवे, घोडेगाव कांदा मार्केट व्यापारी आडतदार संघटना अध्यक्ष अशोकराव येळवंडे यांच्याशी चर्चेनंतर शेतक-यांना रास्ता रोको केले. यावेळी प्रमोद दहातोंडे (चांदा), नवनाथ मुरकुटे (खरवंडी) दुपारी तीन वाजता पुन्हा शेतक-याबरोबर बैठक होऊन त्यात राहिलेले लिलाव योग्य भावाने होतील असे आश्वासन सचिव देवदत्त पालवे यांनी दिल्याने पुन्हा लिलाव सुरळीत सुरु करण्यात आले. त्यानंतर एक नंबर कांद्यास सोळाशे ते अठराशे रुपयांपर्यत भाव मिळाला.आमच्या मालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे. कमीत कमी दोन हजार रुपयांच्या पुढे भाव मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांचे लिलाव झाले असतील त्या मालाचा फेर लिलाव करा. - बाळासाहेब फक्कड पवार, रा. नेवरगाव ता. गंगापूरघोडेगाव येथे आंध्रप्रदेश, कर्नाटक, चेन्नई, पश्चिम बंगाल, केरळ येथील व्यापारी थेट खरेदी करतात. राज्यात जो भाव चालू असेल तसा खर्च वजा जाता व्यापारी माल खरेदी करतात. मागणी व पुरवठा यावर भाव अवलंबुन असतो. घोडेगाव कांदा मार्केट आवकमधे महाराष्ट्रमध्ये एक नंबर आहे. लासलगाव पेक्षा मागील वर्षी येथे जास्त आवक होती. पणन मंडळाकडे तशी नोंद आहे. भाव रास्त मिळतो म्हणूनच आवक जास्त आहे. हे शेतक-यांनी लक्षात घ्यावे. - अशोकराव येळवंडे, अध्यक्ष, घोडेगाव कांदा व्यापारी व आडतदार संघटना.