नेवासा : पोपटराव पाटील यांनी सतर्कता दाखवून परवाना असलेल्या बंदुकीतून केलेला गोळीबार व पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पाटील यांच्या तालुक्यातील माळेवाडी येथील वस्तीवर दरोड्याचा प्रयत्न फसला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत पाटील यांनी सांगितले, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपण लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस आलो असता आंब्याच्या झाडावर आवाज ऐकू आली. अंदाजे ते आठ ते दहा दरोडेखोर येथे होते. मी परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबारा केला. आरडाओरड करून परिसरातील नागरिकांची मदत घेतली. हातात शस्रे असलेल्या दरोडेखोरांनी गोळीबारानंतर पळ काढला. त्याचवेळी घरातील महिलांना एका खोलीत बंद करून माझी तीन मुले व मी बाहेर आलो. अंधाऱ्या रात्री झाडावरून उड्या मारून पळून जाणाºया दरोडेखोरांच्या दिशेने पुन्हा दुसरा फायर केला. हा प्रकार सुरू असतांना आजूबाजूचे लोक ही जमा झाले.या घटनेची माहिती त्वरित नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना दिली. अवघ्या वीस मिनिटातच ते फौजफाट्यासह वस्तीवर दाखल झाले. वस्तीमागे असलेल्या उसाच्या फडात दरोडेखोरांचा शोध घेतला. परंतु दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते.