राहुरी : गेल्या आर्थिक वर्षात मंदीच्या कचाट्यात सापडलेल्या शेतक-याला मध्यंतरी कांद्याला मिळालेल्या भावामुळे दिलासा मिळाला आहे़ मंगळवारी दस-याच्या मुहूर्तावर राहुरीतील साई ट्रॅक्टरमधून एकाच दिवशी चक्क ५० ट्रॅक्टरची विक्री झाली़ शेतक-यांना कांद्याला अचानक मिळालेल्या भावामुळे मंदीतही ट्रॅक्टर्स खरेदी करण्याची संधी मिळाली. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाले होते़ गेल्यावर्षी उसाला हुमणीचा प्रादुर्भाव झाला होता़ याशिवाय दुधालाही समाधानकारक भाव नव्हता़ त्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट होते़ गेल्यावर्षी कांद्याला भाव न मिळाल्याने शेतक-यांनी शेतात कांदा फेकून दिला होता़ यावर्षी भाव मिळतो की नाही या संभ्रम अवस्थेत शेतकरी होते़ काही भागात पावसाने हजेरी लावली़गेल्यावर्षी शेतक-यांकडे पैसा नव्हता़ त्यामुळे इच्छा असूनही ट्रॅक्टर खरेदीकडे कल नव्हता़ आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून शेतक-यांनी प्रकरणे केली़ याशिवाय कांद्याला मध्यंतरी भाव मिळाला. ट्रॅक्टर खरेदीकडे पुन्हा शेतक-यांचा कल वाढला़ दस-याच्या मुहूर्तावर शेतक-यांनी ५० ट्रॅक्टरची खरेदी केली असल्याचे साई उद्योग समूहाचे संदीप गाडे यांनी सांगितले. यंदा ट्रॅक्टर खरेदी करण्याचे नियोजन नव्हते़ मात्र मध्यंतरी कांद्याला समाधानकारक भाव मिळाला़ त्यामुळे दस-याच्या मुहूर्तावर नवीन ट्रॅक्टर खरेदी केला, असे शेतकरी लक्ष्मण बंगाळ यांनी सांगितले.
कांद्याला भाव मिळाल्याने राहुरीत एकाच दिवसात ५० ट्रॅक्टर्सची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 1:27 PM