चंद्रकांत शेळके
अहमदनगर : यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस झाल्याने खरिपाची पिके शेतकºयांना साधणार आहेत. शेतकºयांनी पुरेशी ओल असल्यानंतरच पेरणी करावी. बियाण्यांचा पुरवठा मुबलक आहे. खताच्या पुरवठ्यात मध्यंतरी लॉकडाऊनमुळे काही अडचणी होत्या. परंतु आता खतांचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. त्यामुळे शेतकºयांना बियाणे, खतांचा तुटवडा जाणवणार नाही. परिणामी यंदा खरिपाचे उत्पादन नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनीलकुमार राठी यांनी ‘लोकमत’ संवादादरम्यान व्यक्त केला.
- यंदाच्या खरिपाची स्थिती कशी राहील?राज्यात यंदा चांगला पाऊस आहे. त्यातही नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे खरिपाचे पेरणी क्षेत्र नक्कीच वाढेल. शेतकºयांनी जमिनीत चांगली ओल असल्याची खात्री करूनच पेरणी करावी. ओल कमी असेल तर बियाणे खराब होऊन उगवण व्यवस्थित होत नाही. यंदा खरीप पिकांचे प्रस्तावित क्षेत्र सुमारे साडेचार लाख आहे. त्यापैकी आतापर्यंत २५ टक्क््यापर्यंत पेरणी झालेली आहे. त्यात झपाट्याने वाढ होत आहे.
- शेतकºयांनी कोणत्या पिकांना प्राधान्य द्यावे?भौगोलिक स्थितीनुसार पीक पद्धती बदलतात. जिल्ह्यात दक्षिण भागात खरिपाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने मूग, उडीद पिकांची पेरणी वेळेवर झाली. त्यामुळे ही पिके वेळेवर निघून जमीन पुन्हा रब्बीसाठी मोकळी होईल. याशिवाय यंदा बाजरी, सोयाबीन, कपाशीचे क्षेत्रही मोठे आहे.
- बियाणे, खतांची उपलब्धता कशी आहे?खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के बियाणे व ५१ टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी खतांच्या पुरवठ्यात व्यत्यय आला. परंतु आता तो पूर्ववत होत आहे. शासनाकडे ५७ हजार ७०० क्विंटल बियाणे व २ लाख ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदवली होती. १५ जूनपर्यंत यातील ४० हजार क्विंटल म्हणजे ७० टक्के बियाणे उपलब्ध झाले असून १ लाख ४० हजार मेट्रिक टन (५१ टक्के) खतांची उपलब्धता झाली आहे. प्रस्तावित क्षेत्रापैकी सर्वाधिक १ लाख ६५ हजार हेक्टर क्षेत्र बाजरीचे असून त्याखालोखाल १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे आहे. याशिवाय ७९ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर ७५ हजार हेक्टरवर मका पेरणीचेही नियोजन आहे.
- कोरोना स्थितीचा शेतकरी, शेतीवर काही परिणाम?कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शासनाने कृषी व कृषीसंलग्न सेवांना मुभा दिली होती. त्यामुळे फारशा अडचणी आल्या नाहीत. जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतकºयांना बियाणे, खते खरेदीसाठी येता येत आहे. बियाणे व खतांची वाहतुकही होत आहे. त्यामुळे कोरोना किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा परिणाम शेतीवर झालेला दिसत नाही. ------------