नगर: सुरुवातीला मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने नगर तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांत मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने अद्यापपर्यंत केवळ २० टक्केच पेरणी उरकली आहे. बहुतांश ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. यावर्षीही विक्रमी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित असून त्यात बाजरी,मूग,सोयाबीन आणि कांदा यांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असणार आहे.
दुष्काळ पाचवीला पूजलेल्या नगर तालुक्यावर मागील वर्षीप्रमाणेच यंदा दमदार पाऊस होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानंतर लागलीच मान्सूननेही तालुक्यात दमदार हजेरी लावली. आजपर्यंत मान्सूनपूर्व आणि मान्सून असा तालुक्यात १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून. मान्सूनचा पाऊस वाळकी मंडलात सर्वाधिक १४८.४ मि.मी पावसाची तर सर्वात कमी जेऊर मंडलात ४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर नालेगाव ७६.४, सावेडी ७६, कापूरवाडी ९२, केडगाव ८१, भिंगार ६४.८ नागापूर १२०, चिचोंडी पाटील ७८.७, चास ८८ तर रुई छत्तीशी मंडलात ९१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खतांची खरेदी करत शेताची मशागत करून ठेवली. आता मात्र पेरणीसाठी पुन्हा दमदार पावसाची आवश्यकता आहे.
तालुक्यातील २ वर्षांपूर्वी २२ हजार हेक्टरपर्यंत असणारे खरीप पेरणी क्षेत्र मागील वर्षी ५५ हजार हेक्टरपर्यंत वाढले होते. यावर्षी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
----------------
१० टक्के युरिया वापर कमी करा
शेतकऱ्यांनी वाफसा होईल त्यानुसार पेरणी सुरू करावी, मूग ,सोयाबीन पेरणी १८ इंचावर करून पेरणी वेळीच नत्र, स्फूरद आणि पालाश यांचा २५.५०:० चा डोस द्यावा. कापूस लागवड १५ जूननंतर करावी. खताचा भेसळ डोस लागवडी वेळीच द्यावा. शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया वापरत आहेत. त्याचे दुष्परिणाम मातीवर आणि पिकावर होतात.त्यामुळे किमान १० टक्के युरिया वापर कमी करावा. पेरणी करताना कृषी सहायक यांचा सल्ला घ्यावा.
- पोपटराव नवले,कृषी अधिकारी नगर तालुका
----------------------
जेऊर परिसरात दुबार पेरणीचे संकट
नगर तालुक्यातील जेऊर परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जेऊर मंडलामध्ये तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली. झालेल्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. आता मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.
---------------------
आर्थिक गणित कोलमडणार
मूग, सोयाबीन तसेच बाजरीची पेरणी आहे त्या ओलीवर केली आहे. शेतीच्या मशागतीसाठी मोठा खर्च करावा लागतो. सरासरी एकरी १०हजार रुपये खर्च पेरणीसाठी आला आहे. पावसाने दडी मारल्याने चिंता आहे. दुबार पेरणीची वेळ आल्यास संपूर्ण आर्थिक गणित कोलमडणार आहे.
--हरिभाऊ शेटे, शेतकरी, जेऊर
फोटो आहे.