शिर्डी : खराब हवामानामुळे शनिवारी तिस-या दिवशीही साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली. उद्या रविवारीही विमानसेवा सुरू होईल की नाही याबाबत अनिश्चीतता आहे. यामुळे भाविकांचे हाल सुरू आहेत. शिर्डी विमानतळावर रोज २८ विमानांची आवक जावक असते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून विमानांची घरघर बंद पडली आहे. गुरूवारपासून शिर्डीतील विमानसेवा बंद असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. विशेष म्हणजे विमान कंपन्या प्रवाशांना आगाऊ सूचना देत नसल्याने भाविकांच्या मनस्तापात भर पडत आहे. धुके व ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने विमाने माघारी नेण्यात येत आहेत किंवा अन्यत्र वळविण्यात येत आहेत. काही विमाने रद्दही करण्यात येत आहेत. सलग तीन दिवस विमानसेवा बंद राहिल्याने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व शिर्डी विमानतळ प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात प्रथमच अशा प्रकारची मोठी अडचण आली आहे. यामुळे रन-वे वर लाईट बसविण्याची व नाईट लँडींग सुविधा सुरू करण्याची गरज आहे.सध्या शिर्डी विमानळावरून स्पाईस जेट, इंडियन एअरलाईन्स, इंडिगो आदी विमान कंपन्यांची मुंबई, इंदोर, भोपाळ, बेंगलोर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, जयपूर आदी शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.
खराब हवामानामुळे शिर्डीत तिस-या दिवशीही विमानसेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 6:05 PM