सुधीर लंकेअहमदनगर : ‘मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर’ या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, नगर जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती दिली आहे. चौकशी होईपर्यंत भरतीची कोणतीही प्रक्रिया करू नये, असा आदेश सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिला आहे. या आदेशात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे.जिल्हा बँकेत लिपिक, ज्युनिअर आॅफिसर, प्रथम श्रेणी अधिकारी या पदांच्या ४६४ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे. ‘नायबर’ या खासगी संस्थेमार्फत या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या भरतीप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर २९ आॅक्टोबरच्या अंकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे हे भरतीप्रक्रियेत प्रमुख घटक असताना त्यांचा मुलगाही या भरतीत उमेदवार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली.बँकेच्या पदाधिकाºयांचे नातेवाईक भरतीचे लाभार्थी असल्याचे उदाहरण या वृत्तातून समोर आल्याने सहकार विभागाने त्याची दखल घेत भरतीला स्थगिती दिली. आदेशात ‘लोकमत’च्या वृत्ताचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, अनिल खाडे यांनी सहकार विभागाकडे केलेल्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली असून, त्या तक्रार अर्जांचीही चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व प्रक्रिया स्थगित करण्यास सांगण्यात आले आहे.
‘लोकमत’च्या वृत्तामुळे नगर जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती
By सुधीर लंके | Published: October 30, 2017 5:04 PM