कर्जत : सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. ग्रामस्थांनी या मित्रांचे आभार मानून ग्रामस्थांनीही या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला.मंगळवारी ऐन दुपारची वेळ होती. रखरखते उन.. रस्ता निर्मुनष्य, ओसाड पडला होता. कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे अहमदनगर, सोलापूर, पुणे, बीड, नाशिक, धुळे या जिल्ह्यातील पंधरा सुशिक्षित तरूण येतात आणि वाडीमधील एका व्यक्तीचे घर कोठे आहे अशी विचारणा करतात. ज्या व्यक्तीच्या घराचा पत्ता हे विचारणा करतात.. तो त्यांचा अठरा वर्षापूर्वीचा मित्र होता. त्याचे नाव कै. बळीराम पेटकर होय. मागील महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे या बळीराम पेटकर या तरूण शिक्षकाचे अपघाती निधन झाले होते आणि त्याला भेटण्यासाठी आलेले हे सर्व जण सन २००० साली पुणे येथील महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर येथे एकत्र शिकत होते. यानंतर या सर्वांचा एकमेकांशी फोनवरून होता तेवढाच काय तो संपर्क . ज्या मित्राचे निधन झाले तो बळीराम हा अतिशय गरीब होता. घर पाहिले तर आजच्या काळातही बळीरामचे घर छपराचे होते. त्याची पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार यामध्ये रहात आहे.मित्राच्या अपघाती निधनाची माहिती या मित्रांना समजली. घरचा कर्ता मुलगा गेल्याने सर्व कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे या मित्राच्या कुटुंबाला आधार देण्याचा या सर्व मित्रांनी निर्धार केला आणि यासाठी ते सर्व जण बहिरोबावाडी येथे आले होते. त्यांनी मयत शिक्षक मित्राच्या मुलाच्या नावावर बँकेमध्ये एक लाखाची ठेव ठेवल्याची पावती आणि आईला २५ हजार रुपये रोख दिले. यावेळी त्या सर्वांनी आमचा मित्र आम्ही गमावला आहे हे नुकसान भरून येणारे नाही. आम्ही करीत आहोत ते आमचं कर्तव्य आहे. आम्हाला त्याची प्रसिध्दी नको आहे हे सांगताना सर्व जण भावनिक झाले होते. प्रत्येक मित्राच्या डोळ्याच्या कडा आठवणीने ओल्या झाल्या होत्या. हे सर्व दृष्य पाहून गावचे सरंपच विजय तोरडमल, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर व उपस्थित ग्रामस्थ भावनिक झाले होते.२० वर्षापूर्वीच्या मित्राच्या दुर्घटनेनंतर त्याच्या कुटुंबाचे दु:ख कमी व्हावे म्हणून त्यांचे सांत्वन करण्यासाठी आलेले हे सर्व मित्र व त्यांनी मैत्रीचे जपलेले नाते व सामाजिक बांधिलकी हे सर्व समाजाला एक प्रेरणा देणारा प्रसंग आहे. यावेळी सरंपच आणि ग्रामस्थांनी आलेल्या सर्व मित्रांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावून आभार मानले.
मित्रावरील प्रेमामुळे बहिरोबावाडी ग्रामस्थांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:49 PM
सामाजिक बांधिलकी व मैत्रीचा अनोखा अनुभव मंगळवारी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथे नागरिकांना अनभुवयास मिळाला. अपघातात मयत झालेल्या मित्राच्या कुटुंबाला मदतीचा हात मित्रांनी दिला. मित्रावरील या प्रेमामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.
ठळक मुद्दे मयत मित्राच्या मुलाच्या नावे एक लाखाची ठेव आईला दिले २५ हजार रुपये रोख बहिरोबावाडी ग्रामस्थांनी मानले आभार