पारनेर (जि.अहमदनगर) : प्रत्येक गावात राजकीय पक्षांचे राजकारण शिरल्याने गावच्या विकासात खीळ बसत आहे. सरपंचांनी पक्ष विरहित निवडणूक लढविली पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धीत दोन दिवशीय सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यशाळेच्या सांगताप्रसंगी ते बोलत होते. हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करीत असेल तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण राजकीय पक्षांमुळे गावातील लोक दोन गटात विभागले गेलेले आहेत. यामुळे गावात भांडण-तंटे वाढले आहेत.
सरपंच ग्रामसंसद महासंघाचे सरचिटणीस दत्ता आवारी म्हणाले, राज्यात सरपंच कार्यशाळा घेऊन हजारे यांचे विचार गावागावात पोहोचविणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष सरपंच कैलास पटारे, महिला उपाध्यक्ष सरपंच रोहिणी गाजरे, संघटक सरपंच प्रविण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे यांच्यासह राज्यातील बुलढाणा, कोल्हापूर, अकोला, अहमदनगर, पुणे, हिंगोली, सातारा, बीड जिल्ह्यातील सरपंचांसह इतर जिल्ह्यातील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पक्षविरहीत निवडणूक लढवाकाही लोक पक्ष व गटातटामागे लागून सरपंच होतात. असे न करता गावातील लोकांनी पक्षविरहीत निवडणूक लढविल्यास खऱ्या अर्थाने गावाचा व देशाचा विकास होईल, असे मत अण्णा हजारे यांनी मांडले.