कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतो. माणसांबरोबरच पशुपक्षी व रानात चरणारी जनावरेही झाडाच्या सावलीला आसरा घेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कडक उन्हाळ्याच्या सुरुवातीचा हा आठवडा असून सध्या वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे. सकाळी आठनंतर तापमानात वाढ होत जाते. दुपारी वातावरणातील उकाडा अधिकच वाढत आहे. त्यामुळे घामाच्या धारांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येणे, जुलाब होणे यासारख्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नसले तरी कष्टाची कामे करणारे, हृदयरोग, उच्च रक्तदाब, गरोदर माता, वृद्ध, लहान मुले, एक वर्षाखालील बालके यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन खाजगी वैद्यकीय व्यावसायिक करत आहे.
..................
अशी घ्या काळजी
उन्हापासून बचाव व्हावा व आजारी पडू नये यासाठी वारंवार शुद्धिकरण केलेले भरपूर पाणी प्या. दुपारचा प्रवास टाळा. प्रवासातही सोबत मास्क, सॅनिटायझर आणि शुद्ध पाणी ठेवा. सरबत, ताक, लस्सी, ओआरएस, फळांचे रस, कलिंगड, काकडी, लिंबू, संत्री यांचे अधिकाधिक सेवन करा. शक्यतो सावलीत राहा. थंड पाण्याने अंघोळ करा. फिकट रंगाचे अति सैलसर कपडे घाला.
३० दहिगावने
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील गजबजलेल्या चौकात भरदुपारी असा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.