अहमदनगर : यंदा विदर्भासह सर्व महाराष्ट्रातच उष्णतेची लाट आलेली असल्याने उष्माघाताचा धोका लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांना १० दिवस आधीच सुटी जाहीर झाली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची प्रगतिपुस्तकेही शिक्षकांनीच घरपोहोच करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.
राज्यभर यंदा प्रचंड उन्हाचा कडाका आहे. त्यामुळे राज्यात उष्माघाताने अनेकांना त्रास झाला. खारघर येेथे झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला. त्यामुळे वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूूमीवर शिक्षण विभागही सतर्क झाला. उन्हाचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये म्हणून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर म्हणजे २१ एप्रिलपासूनच विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर केली.
दरवर्षी १ मे रोजी प्राथमिक शाळांचा निकाल प्रसिद्ध होतो. विद्यार्थ्यांसह पालकांना शाळेत बोलावून त्यांचे प्रगतिपुस्तक दिले जाते. परंतु वाढती उष्णता लक्षात घेता यंदा विद्यार्थी किंवा पालकांना शाळेत न बोलावता निकालाचे प्रगतिपुस्तक शिक्षकांनी विद्यार्थ्याला घरपोहोच करावे, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत.
पहिली ते नववीपर्यंतच्या जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रगतिपुस्तक घरपोहोच द्यावे लागणार आहे. या आदेशामुळे शिक्षकांचे काम मात्र वाढले आहे. दरम्यान, सुटीनंतर शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत.