अरुण वाघमोडे/ अहमदनगर: सातवा वेतन आयोग लागू करावा, सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी संघटनेने सोमवारपासून नगर ते मंत्रालय (मुंबई) असा पायी लाँगमार्च काढला असून ७५ टक्के कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. मंगळवारी मनपाच्या मुख्य कार्यालयासह जुने कार्यालय व प्रभाग कार्यालयात अपवाद वगळता शुकशुकाट होता.
शहरातील दैनंदिन स्वच्छतेचे कामकाज थांबू नये, यासाठी मनपा प्रशासनाने कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या माध्यमातून तात्पुरते १५० कर्मचारी उपलब्ध करत शहरात सफाईचे काम सुरू केले. या कर्मचाऱ्यांना मात्र, शहरात विविध ठिकाणी काही जणांनी धक्काबुक्की करत दमदाटी करून काम करू नका, असे सांगितले.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करत दमदाटी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असल्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. दरम्यान सावेडी येथील कचरा रॅम्पवर मंगळवारी दुपारी १०० ते १५० जणांच्या जमावाने येत शहरात कचरा संकलन करू नका, घंटागाड्या ताेडू, असा ईशारा दिला. मनपाने नागरी सुविधांसाठी केलेल्या पर्यायी व्यवस्थेला विरोध होत असल्याने मनपा प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दमदाटी करणारे कोण आहेत. हे मात्र, स्पष्ट झालेले नाही.