अहमदनगर : नगरमध्ये नुकत्याच झालेल्या संगणक टंकलेखन परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याची घटना ताजी असतानाच महसूल विभागाने घेतलेल्या तलाठी परीक्षेतही पाच बनावट उमेदवारांनी लेखी परीक्षा दिल्याचे गुुरुवारी (दि़२३) समोर आले. या उमेदवारांची कागदपत्रे तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. यात पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना अटक झाली आहे. याप्रकरणी महसूल विभागातील अव्वल कारकून जीवन भानुदास सुतार यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विशाल सखाराम इंगळे (वय २४ रा़ बावणे, ता़ पुसद, जि़ यवतमाळ), मंगेश कुंडलिक दांडगे (वय ३४, रा़ सुरंगळी ता़ भोकरदन, जि़ जालना), अंजली गोपाल म्हस्के (वय २४ रा़ चैतन्यवाडी, ता. जि़ बुलढाणा), पंढरीनाथ पुंजाजी साबळे, रवी जंगल पवार यांच्यासह इतर पाच अनोळखींविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर नमूद परीक्षांमध्ये होणा-या गैरव्यवहारास प्रतिबंध अधिनियम १९८२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इंगळे, दांडगे व म्हस्के यांना महसूल विभागाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. महसूल विभागामार्फत १२ जानेवारीला तलाठी व वाहनचालक पदासाठी येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना २३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रे तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. उत्तीर्ण उमेदवारांसह विशाल इंगळे, मंगेश दांडगे व अंजली म्हस्के हे तिघे आले होते. परंतु दोघे गैरहजर राहिले. कागदपत्रे तपासणीसाठी आलेले उमेदवार व परीक्षा दिलेले उमेदवार यांची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाने परीक्षेच्या वेळी काढलेले व्हीडिओचित्रण तपासले. त्यात परीक्षा देणारे उमेदवार दुसरेच असल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने प्रशासनाने या तिघांकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे हे डमी उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केली तेव्हा आणखी दोन जण डमी असल्याचे समोर आले. तिघांना पोलिसांच्या ताब्यात देत याप्रकरणी गुरुवारी रात्री फिर्याद दाखल केली़. याप्रकरणी सहायक निरीक्षक मुंडे हे पुढील तपास करत आहेत. यात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून उर्वरित उमेदवारांचा शोध सुरू आहे.
नगरमध्ये तलाठी परीक्षेत पाच जण बसले डमी; दहा जणांवर गुन्हा,तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:52 PM