कोतूळ : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या एका तरुणाला मुरबाड ते ब्राम्हणवाडा या प्रवासाचे पाच हजार रुपये भाडे मागीतले. ते भाडे न दिल्याने प्रवासात चालक, क्लिनरने त्याचा छळ केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे उघडकीस आली.
याबाबत तरुणाने अकोले पोलिसांना तसा अर्जही दिला. परंतू राजकीय दबावापोटी कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. १३ जून रोजी ब्राम्हणवाडा येथील मुंबईत काम करणारा विक्रम सोनवणे हा तरूण मुंबई येथून गावाकडे पायी येत होता. यावेळी मुरबाड येथे त्याला आपल्या गावातील ट्रक दिसला. त्याला आनंद वाटला. ट्रकवरील चालक, क्लिनर ओळखीचे असल्याने विक्रमने गावी यायचे असे सांगितले. त्यास त्यांनी गाडीच्या टपावर बसवले. जोरदार पाऊस सुरू असताना गाडी काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला पाच हजार भाडे दे.. नाहीतर उतरू घे..असे धमकावले. त्याने माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर त्याला घाटात उतरवले.
गाडीमागे पळायला लावले. त्याने हातापाया पडून पाचशे रुपये दिले. उरलेले गावी गेल्यावर देतो, असे सांगितले. यानंतर त्यांनी कसेबसे ब्राम्हणवाडा येथे सोडले. दरम्यान प्रवासात वारंवार शिवीगाळ देखील सुरू होती.
ही सर्व आपबीती या तरूणाने गावचे पोलीस पाटील व सरपंचांना सांगितली. १५ जून रोजी अकोले पोलिसातही त्यांच्या विरोधात अर्जही दिला. तरीही राजकीय दबावापोटी या प्रकाराची पोलिसांनी अद्यापर्यंत साधी चौकशीही केली नाही.