जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण चालू असताना बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहका-यांनी सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. कार्यकर्त्यांना पकडून पोलीस व्हॅनमध्ये बसवले जात असताना एका कार्यकर्त्यांने दगड मारला असता तो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अण्णा पवार यांना लागला. त्यामुळे पवार जखमी झाले. गोंधळ घालणारे २५ कार्यकर्ते पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.पुण्यश्लोक आहील्यादेवींची २९३ व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे आयोजीत कार्यक्रमाला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. प्रास्ताविक पडवळ यांच्या भाषणानंतर पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण सुरु झाल्यानंतर बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ इंद्रकुमार भिसे सभामंडपाच्या समोरील बाजूने उभे राहून आरक्षणाच्या घोषणा देऊन पत्रके भिरकावली. थोड्या वेळाने दुसरा गट आक्रमक झाला. त्यानेही घोषणाबाजी केली. कार्यक्रम उधळला जावू नये, म्हणून पोलिस मंडपात घुसले.पोलिसांनी डॉ. भिसे व कार्यकर्त्यांना उचलून सभामंडपाच्या बाहेर नेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवीत असताना अचानक एक दगड पोलिसांच्या दिशेने आला. पोलीस पवार यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले.स्वत: सुमित्रा महाजन यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले, मात्र गोंधळ सुरुच होता.भिसेंना होती जिल्हाबंदीचौंडीच्या कार्यक्रमावरुन धनगर समाजात दोन गटात धुसफूस सुरु आहे. बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांनी हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करुन तिथे दुस-या कार्यक्रमासाठी परवानगी मागीतली होती. मात्र ती परवानगी पोलिसांनी नाकारून १४९ नोटीस दिली तसेच जिल्हाबंदी घालण्यात आली होती. चोंडी येथील सिना नदी पात्रात डॉ. भिसे व त्यांच्या सहका-यांनी जयंती साजरी करून मुख्य कार्यक्रमात आले. व घोषणाबाजी करून गोंधळ घातला.