नेवासा : तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे गुरुवारी (दि.५) गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. १२ डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार असून बुधवारी (दि.११) सायंकाळी ६ वाजता भगवान दत्तात्रयांचा मुख्य जन्मसोहळा होणार आहे. मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ज्ञानसागर सभामंडपात दत्तजयंती महोत्सवानिमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ करण्यात आला. गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेव लोखंडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले. गुरुवारी दत्तजयंतीनिमित्त पहाटे ४ पासून मंगल वाद्य, ४.३० ते ६.३० वाजेदरम्यान काकडा भजन व श्रींची प्रात:आरती करण्यात आली़ त्यानंतर दर्शन प्रदक्षिणा, गीतापाठ व विष्णू सहस्त्रनाम, सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १ ते ३ यावेळेत समयानुसार आलेल्या गुणवंतांचे कार्यक्रम, तसेच ३ ते ५ यावेळेत पुन्हा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ७ यावेळेत हरिपाठ व श्रींची सायं आरती असे कार्यक्रम झाले़ श्री दत्तजयंती कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे. जयंती महोत्सव कालावधीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले.
देवगड येथे दत्तजयंती सोहळ्यास प्रारंभ; १२ डिसेंबरपर्यंत चालणार विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 11:36 AM